Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र सदनात २३ जुलै रोजी ‘माझे माहेर पंढरी’ कार्यक्रम


गायिका शमिमा अख्तर यांचे अभंग गायन; वारीवरील विशेष माहितीपटाचेही प्रदर्शन

नवी दिल्ली : आषाढी एकादशीनिमित्ताने महाराष्ट्र सदन, येथील सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जुलै रोजी ‘माझे माहेर पंढरी’ या विशेष भक्तीसंध्या कार्यक्रमाचे महाराष्ट्र सदनात आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायिका शमिमा अख्तर मराठी अभंगांचे सादरीकरण करणार असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘डिस्कवरी’च्या सहकार्याने तयार केलेल्या पंढरपूर वारीवरील विशेष माहितीपटाचे स्क्रीनिंग यावेळी केले जाणार आहे.

दिल्लीकरांना विठूभक्तीच्या रसात भिजण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे. महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 जुलै रोजी महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात सायंकाळी सहाला होणाऱ्या या कार्यक्रमात गायिका शमिमा अख्तर आपल्या सुरेल आवाजात विविध अभंग सादर करणार आहेत. मंत्री सामंत यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. या सोबतच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी वाहिनीच्या सहकार्याने निर्मिलेल्या ‘Pandharpur Wari : In The Footsteps of Saints’ (पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा) या विशेष माहितीपटाचे स्क्रिनिंग यावेळी होणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल आणि ‘सरहद’चे समन्वयक लेशपाल जवळगे यांनी केले आहे.

पंढरपूर वारी माहितीपटाविषयी…

महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वारीचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्यातून हा माहितीपट मराठी, इंग्रजीसह विविध नऊ भाषांमध्ये तयार करण्यात येत आहे. ‘डिस्कव्हरी’मार्फत या माहितीपटाचे प्रसारण सार्क देशांमध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला समानतेची शिकवण देणारी, ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण अशी संत परंपरा लाभली आहे. या परंपरेची अनुभूती देणाऱ्या आषाढी वारीवर आधारित हा माहितीपट आहे.

वारी या माहितीपटाचे हिंदी, तमिळ, तेलगु, बंगाली, कन्नड, मल्यालम या भाषांमध्ये डबिंग करुन त्याचे डिस्कव्हरीच्या विविध सॅटेलाईट वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विविध भाषांमधील माहितीपटाचे प्रसारण डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, अ‍ॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो अशा ९ वाहिन्यांवरुन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |