Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शिळफाटा उड्डाणपुलाला "श्री. खरवली देवी उड्डाणपुल" नाव द्या; नगरसेविका वेदिका पाटील यांचा ठाणे महापालिकेकडे प्रस्ताव


 भोलेनाथनगर येथील जागृत देवस्थानाचा मान राखण्याची नागरिकांची मागणी

विनोद वास्कर ( शिळफाटा / ठाणे ), दि. १६ : ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मधील शिळफाटा जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला "श्री. खरवली देवी उड्डाणपुल" असे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. वेदिका साहिल पाटील यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे अधिकृत प्रस्तावाद्वारे केली आहे. भोलेनाथनगर परिसरातील जागृत श्री. खरवली देवी मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या उड्डाणपुलाला देवीचे नाव देऊन स्थानिकांच्या धार्मिक भावना आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

नगरसेविका वेदिका पाटील यांनी १३ जुलै २०२६ रोजी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव, महापौर तसेच महापालिका सचिव यांना लेखी पत्र सादर करून हा प्रस्ताव मांडला आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, दिवा प्रभाग समितीच्या हद्दीतील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मौजे शिळ, भोलेनाथनगर (खरवली देवी परिसर), पोस्ट डावले, ता. व जि. ठाणे येथे असलेले श्री. खरवली देवी मंदिर हे अनेक वर्षांपासून जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

एमएमआरडीएने उभारला उड्डाणपूल

शिळफाटा जंक्शन येथील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या माध्यमातून उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. हा उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरत असून दररोज हजारो वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाणपुलाला स्थानिक श्रद्धास्थानाचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून सातत्याने होत असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांच्या भावनांचा आदर करण्याची मागणी

प्रभाग क्रमांक २९ तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावना आणि सांस्कृतिक परंपरेचा आदर राखण्यासाठी शिळफाटा उड्डाणपुलाचे नामकरण "श्री. खरवली देवी उड्डाणपुल" असे करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वेदिका पाटील यांनी केली आहे. स्थानिकांच्या भावनांचा सन्मान राखत या प्रस्तावाला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रस्तावाला अनुमोदन

या नामकरण प्रस्तावावर कृष्णा शारदा दादू पाटील यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. तसेच या प्रस्तावाची प्रत भाजप गटनेते मुकेश मोकाशी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापालिका सचिव यांनाही पाठविण्यात आली आहे.

सर्वसाधारण सभेत ठरावाची अपेक्षा

नगरसेविका वेदिका पाटील यांनी हा प्रस्ताव आगामी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेस घेऊन त्यास मंजुरी देण्यात यावी व त्यानंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करून उड्डाणपुलाचे अधिकृत नामकरण "श्री. खरवली देवी उड्डाणपुल" असे करण्यात यावे, अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या श्री. खरवली देवी मंदिराच्या नावाने उड्डाणपुलाचे नामकरण झाल्यास परिसराची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होईल, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |