नवी मुंबई, दि. २६ : कोपरखैरणे गावातील गणेशभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या 'कोपरखैरणे गावाचा राजा – गणराज बाप्पा' यांच्या पाद्यपूजन सोहळ्याचे आज भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. पारंपरिक विधी, मंत्रोच्चार आणि गणरायाच्या जयघोषात संपन्न झालेल्या या सोहळ्याने आगामी गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकृतपणे प्रारंभ झाला असून, आता सर्व गणेशभक्तांना बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीतील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी मानल्या जाणाऱ्या पाद्यपूजन सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या विधीमुळे मंडळाच्या विविध उपक्रमांना शुभारंभ होत असून, गणरायाच्या आगमनासाठी मंडप उभारणी, सजावट आणि इतर नियोजनाला वेग आला आहे.
यावर्षी गणराज बाप्पाची १० फुटांची भव्य आणि आकर्षक मूर्ती साकारण्यात येत असून, तिची निर्मिती सुप्रसिद्ध मूर्तीकार स्व. अरुण दत्ते यांचे शिष्य आणि नवी मुंबईचे युवा मूर्तीकार कु. तेजस (दादा) वालेकर यांच्या हस्ते केली जात आहे. विशेष म्हणजे, यंदा 'शिव-शंभू' या संकल्पनेवर आधारित बाप्पाचे अनोखे आणि आकर्षक रूप साकारले जाणार असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
श्री गणराज मित्र मंडळाच्या वतीने श्री मांगीरदेव चौक येथे उभारण्यात येणाऱ्या मंडपात विधिवत पूजन करून गणेशोत्सवाच्या कामांना शुभारंभ करण्यात आला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात गणेशभक्तांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आगामी गणेशोत्सव निर्विघ्न, यशस्वी आणि मंगलमय होण्यासाठी आशीर्वाद मागितले.
या प्रसंगी गणराज मित्र मंडळ तसेच कोपरखैरणे गाव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष दिनेश वामन वेटा, उपाध्यक्ष अजित संतोष उतेकर, खजिनदार रोहित रमेश म्हात्रे, आधारस्तंभ आदेश किसन म्हात्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य गणेशभक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
यावेळी उपस्थितांनी गणरायाच्या आगमनासाठी सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली आणि यंदाचा गणेशोत्सव अधिक भव्य, दिव्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पाद्यपूजन सोहळ्याबाबतची माहिती ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने धार्मिक परंपरा जपत समाजोपयोगी उपक्रम आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणराज बाप्पाच्या आगमनासाठी सर्व गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

