कल्याण : "विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मोठे ध्येय ठेवून त्यासाठी अथक परिश्रम केले पाहिजेत. अशी भरारी घ्या की आई-वडिलांच्या डोळ्यांत तुमच्याविषयी अभिमानाची चमक दिसली पाहिजे. आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहण्यासाठी प्रयत्न करा, प्रेयसीच्या नाही," असा प्रेरणादायी संदेश खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी मुक्त संवाद साधत जीवनात ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रेरणादायी चित्रपटांची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रमाची प्रेरणा दिली. तसेच वाढते सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करून जनजागृतीही केली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, आदर्श करिअर पॉईंट, नाशिकचे संचालक गोरक्ष सांगळे, अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक, सरचिटणीस अर्जुन डोमाडे तसेच कोषाध्यक्ष प्रा. रामनाथ दौंड उपस्थित होते.
या सोहळ्यात कल्याण-डोंबिवली परिसरातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच जयश्री दौंड आणि दिगंबर पालवे यांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान करून स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देत सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक उपक्रम शाखेच्या अध्यक्षा चंद्रकला दराडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. शरद पालवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखा समन्वयक आत्माराम फड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन उगलमुगले, माधव दराडे, अनिल दौंड, स्वाती यलमामे, मीनल दराडे आणि यशोदा आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

