भाल टेकडीवर वृक्षारोपण; हरित महाराष्ट्रासाठी सर्वांनी पुढे यावे – आमदार राजेश मोरे
डोंबिवली / कल्याण : परमपूज्य डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या प्रेरणेतून आणि सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन अभियानात भाल टेकडी येथील वन विभागाच्या हद्दीत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
"वृक्ष लावा... वृक्ष जगवा" हा केवळ संदेश नसून भावी पिढीला हिरवाईचा अमूल्य वारसा देण्याचा संकल्प असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. वाढते प्रदूषण कमी करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे, पावसाचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि पुढील पिढीला स्वच्छ, समृद्ध व हिरवेगार वातावरण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, उपआयुक्त संजय जाधव, आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक विजय जोशी, कैलास जोशी, प्रणाली जोशी, निलेश खांबायत, शाखाप्रमुख धनेश म्हात्रे, साजन मढवी, भास्कर चिकणकर, सुनील राणे आणि ऋतिक म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी वृक्षारोपण करून प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. समाजाने निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून हरित व समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्यावे, असेही आमदार राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.
"परमपूज्य डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून भाल टेकडीवर वृक्षारोपण; हरित महाराष्ट्रासाठी मान्यवरांचा सामूहिक संकल्प."
जुलै ०८, २०२६

