डोंबिवली (प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक २९ अंतर्गत शीळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील यांनी शिळफाटा चौक, खान कंपाऊंड, शिबली नगर, महापे रोड तसेच शीळ गावातील विविध भागांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात कचरा गटारांमध्ये अडकल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी हनुमान मंदिर, शिवा भवानी चौक आणि परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या नाले विभागाचे अधिकारी ढोले, बांधकाम विभागाचे अधिकारी दीपक माने व सचिन भालेराव, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी वैदंडे आणि संजय जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत निचऱ्याची कामे हाती घेतली.
खार्डी गावात काही बिल्डरांनी केलेल्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा अडत असल्याचे पाहणीत आढळून आले. त्यानंतर संबंधित भराव फोडून पाण्याला मार्ग करून देण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच डायघर गावातील दत्त मंदिर परिसरात गटाराची उंची वाढल्याने सुमारे ३०० ते ४०० फूट रस्त्यावर दोन फूटांपर्यंत पाणी साचले होते. तेथे जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "कृपया कचरा गटारात किंवा रस्त्यावर टाकू नका. योग्य ठिकाणी कचरा ठेवून महानगरपालिकेला सहकार्य करा. नागरिकांच्या छोट्याशा सहकार्यामुळे अशा पूरस्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते."
या पाहणी दौऱ्यात उपशहर प्रमुख चंदू अलिमकर, दत्तू मामा, खार्डी शाखाप्रमुख शंकर पाटील, चांदीचापाडा शाखाप्रमुख जयंत वालीलकर, राजेश म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

