महाविद्यालयाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी दोन कूपनलिका उभारण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचे आश्वासन
ठाणे (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक २९ मधील फडकेपाडा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी जवळपास २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रभागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वृक्षलागवड उपक्रमाला या माध्यमातून आणखी एक महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
या वृक्षलागवड उपक्रमात महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. पाटील सर, नगरसेविका अर्चनाताई पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आकाश पाटील, दत्तूमामा, नाना मोकाशी, संजय लाऊट यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आगामी ऑक्टोबर- नोव्हेंबरदरम्यान निधीतून दोन कूपनलिका उभारून देण्याचे आश्वासन नगरसेवक श्री. बाबाजी बाळाराम पाटील यांनी यावेळी दिले. महाविद्यालयाला आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी हा उपक्रम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
“वृक्षलागवडीसोबतच त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रभागातील पर्यावरण अधिक समृद्ध करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील,” असा विश्वास नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरातील हिरवाई वाढण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांमध्येही पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश पोहोचणार आहे.

