कल्याण : प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील सापाड गावचे ज्येष्ठ नागरिक सुरेश सीताराम गोडे (७१) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुरेश गोडे हे अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांनी रेल्वे सेवेत प्रदीर्घ काळ सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर ते कुटुंबासमवेत घरीच राहत होते. काही काळापासून त्यांना हृदयाचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर काटई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचारानंतर ते घरी आले होते. मात्र, अचानक त्यांच्या रक्तदाबात मोठी घट झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सापाड गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार योगेश गोडे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने गोडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

