Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - महापौर शर्मिला पिंपळोलकर

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझर अनावरण सोहळयास अभिनेते आदिनाथ कोठारे, निलेश साबळे यांची उपस्थिती

ठाणे (24) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार, 30 ऑगस्ट 2026 रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. ‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये 25 हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दिपक जाधव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते (श.प)अभिजीत पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 मनिष जोशी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, अभिनेते व निर्माता मंगेश देसाई आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेपूर्वी 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझरचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते, अभिनेते नीलेश साबळे व आदीनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट व मॅरेथॉनच्या सन्मानचिन्हांचे अनावरण करण्यात आले.

मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाही 21 किलोमीटर पुरुष व महिला, 18 वर्षांवरील पुरुष 10 किलोमीटर आणि 18 वर्षांवरील महिला 10 किलोमीटर या प्रमुख गटांसाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

21 किलोमीटर स्पर्धेसाठी एक लाखांचे प्रथम पारितोषिक

21 किलोमीटर पुरुष व महिला गटातील स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन पुन्हा महापालिका भवन येथेच समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 75 हजार रुपये, तृतीय क्रमांकाला 50 हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाला 30 हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाला 20 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय इतर आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.

18 वर्षांवरील महिलांसाठी 10 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 20 हजार, तृतीय 15 हजार, चतुर्थ 10 हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी 7 हजार 500 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

18 वर्षांवरील पुरुषांची 10 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन मिलेनियम टोयोटा येथे समाप्त होईल. या गटासाठीही प्रथम 25 हजार, द्वितीय 20 हजार, तृतीय 15 हजार, चतुर्थ 10 हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी 7 हजार 500 रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

15 वर्षांवरील मुले-मुलींसाठी 5 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन ते माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक या मार्गावर होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 8 हजार, द्वितीय 5 हजार, तृतीय 5 हजार 500, चतुर्थ 5 हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी 4 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 12 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 3 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम 5 हजार 500, द्वितीय 5 हजार, तृतीय 4 हजार 500, चतुर्थ 3 हजार 500 आणि पाचव्या क्रमांकासाठी 3 हजार रुपयांचे पारितोषिक आहे. शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठीही विशेष स्पर्धा

60 वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महापालिका भवन येथून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे प्रथम 5 हजार, द्वितीय 4 हजार, तृतीय 3 हजार, चतुर्थ 2 हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी 1 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 3 किलोमीटरची स्पर्धा

ठाणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांत 3 किलोमीटरची स्पर्धा होणार आहे. महापालिका भवन येथून सुरू होऊन याच ठिकाणी या स्पर्धेचा समारोप होईल. या गटातील विजेत्यांना प्रथम 5 हजार, द्वितीय 4 हजार, तृतीय 3 हजार, चतुर्थ 2 हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी 1 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

‘रन फॉर फन’मध्ये सर्व वयोगटांना संधी

‘रन फॉर फन’ ही 1 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. विजेत्यांना प्रथम 5 हजार, द्वितीय 4 हजार, तृतीय 3 हजार, चतुर्थ 2 हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी 1 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्पर्धक विजेता ठरला तरी पारितोषिकाची संख्या आणि रक्कम समान राहणार आहे.

मॅरेथॉन मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश

मॅरेथॉनमध्ये 25 हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याने स्पर्धा मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. धावपटूंना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

‘ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे’

प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होत असलेल्या या महापौर वर्षा मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता शहराच्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव म्हणून सहभागी व्हावे. शालेय विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने धावून मॅरेथॉनचा उत्साह वाढवावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |