Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाईची मागणी


दिवा-शीळ नागरी हक्क समितीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन

दिवा : दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या बांधकामांवर तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दिवा-शीळ नागरी हक्क समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली येथे आयोजित जनता दरबारात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

दिवा परिसरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामे सुरू असून, त्यामुळे परिसरातील नियोजनबद्ध विकासाला बाधा निर्माण होत असल्याचा मुद्दा समितीच्या वतीने निवेदनातून मांडण्यात आला. संबंधित बांधकामांमुळे भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा तसेच मूलभूत नागरी सुविधांवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याचा धोका असल्याचेही समितीने निदर्शनास आणून दिले.

जनता दरबारात नागरिकांच्या समस्या आणि मागण्या ऐकून घेत असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामांची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या निवेदनाची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चौकशीनंतर अनधिकृत आढळणाऱ्या बांधकामांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासनही खासदारांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, दिवा परिसरात गेल्या काही काळापासून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न नागरिकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनधिकृत बांधकामांना वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि इतर नागरी सुविधांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही समितीने म्हटले आहे.

दिवा-शीळ नागरी हक्क समितीच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अनधिकृत बांधकामांवर तातडीने ठोस व कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खासदारांच्या निर्देशानंतर आता ठाणे महानगरपालिका प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे दिवावासीयांचे लक्ष लागले आहे.

यावेळी निवेदन देताना माजी नगरसेवक हिरा पाटील, ॲड. रोहिदास मुंडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |