नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या मागणीला यश
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्याकडून संबंधित विभागाला योग्य आदेश
अंबरनाथ दि. १३ (नवाज अब्दुलसत्तार वणू ) अंबरनाथ शहरातील बहुप्रतिक्षित सॅटिस प्रकल्प, डी.पी. रोड तसेच इतर नियोजित महत्त्वाच्या विकासकामांसाठी आवश्यक असलेली डिफेन्स इस्टेट अंबरनाथची जमीन अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. यासंदर्भात नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी केलेल्या मागणीची दखल घेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा केला आहे. नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्ली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अंबरनाथमधील डिफेन्स इस्टेटची जमीन नगरपरिषदेला लवकरात लवकर हस्तांतरित करण्यासंदर्भातील सविस्तर निवेदन त्यांना दिले.
या निवेदनामध्ये प्रामुख्याने अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस प्रकल्प, कल्याण–बदलापूर रोड ते अंबरनाथ रेल्वे स्थानक जोडणारा प्रस्तावित डी.पी. रोड तसेच शहरातील इतर नियोजित सार्वजनिक पायाभूत सुविधा व विकासकामांसाठी संरक्षण विभागाच्या जमिनीची असलेली तातडीची आवश्यकता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांची भेट घेऊन सदर विषय त्यांच्यासमोर मांडला. अंबरनाथ शहराच्या विकासाच्या दृष्टीने डिफेन्स इस्टेटची संबंधित जमीन अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याची विनंती त्यांनी संरक्षण राज्यमंत्र्यांकडे केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विनंतीला मान देत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित संरक्षण विभागाला आवश्यक ती कार्यवाही करून योग्य आदेश पारित करण्याचे निर्देश केले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. सदर डिफेन्स इस्टेटची जमीन अंबरनाथ नगरपरिषदेला उपलब्ध झाल्यानंतर सॅटिस प्रकल्पाच्या अंमलबजावणीसह डी.पी. रोड, काँक्रीट रस्ते व इतर नियोजित नागरी पायाभूत सुविधा आणि विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे. यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊन शहरातील लाखो नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
याबाबत नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी सांगितले की, “अंबरनाथच्या भविष्यातील विकासासाठी सॅटिस प्रकल्प आणि डिफेन्स इस्टेटची जमीन अत्यंत महत्त्वाची आहे. मी १२ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडला. त्यांनी तातडीने या मागणीची दखल घेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांच्याकडे विषय मांडून सकारात्मक पाठपुरावा केला. संरक्षण राज्यमंत्र्यांनीही संबंधित विभागाला योग्य आदेश दिल्यामुळे अंबरनाथच्या या महत्त्वाच्या विकासकामांचा मार्ग लवकरच मोकळा होईल, असा विश्वास आहे.” अंबरनाथ शहराच्या विकासासाठी या महत्त्वपूर्ण विषयात तातडीने पुढाकार घेतल्याबद्दल नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांचे आभार व्यक्त केले आहेत.

