Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

भाजपा नगराध्यक्ष तेजश्री करंजले- पाटील यांनी अंबरनाथ शहरातील विकासाच्या विषयांवर वनमंत्री गणेश नाईक यांची घेतली भेट



अंबरनाथ / नवाज वणू  : अंबरनाथ शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर अंबरनाथ नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. तेजश्री करंजुले-पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. अंबरनाथ शहराच्या भविष्यातील गरजा, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मीनगर येथील सर्वे नं. ३४ आणि ३५ मधील वन विभागाच्या अखत्यारीतील जमिनीवर अनेक गोरगरीब कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र वन विभागाच्या जमिनीचा प्रश्न प्रलंबित असल्याने येथील अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना त्यांच्या घरांबाबत अद्याप कायदेशीर हक्क मिळालेला नाही. या प्रश्नावर शासन निर्णयातील तरतुदींनुसार वन विभागाकडून आवश्यक 'ना-हरकत प्रमाणपत्र' देण्यात यावे. संबंधित जमीन महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच १ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या पात्र रहिवाशांना शासनाच्या नियमानुसार कायदेशीर हक्क व नियमितीकरणाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.

अंबरनाथ शहरातील वाढती पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रस्तावित ९६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र आणि तीन नवीन उंच जलकुंभांच्या प्रकल्पाचाही मुद्दा वनमंत्री गणेश नाईक यांच्यापुढे मांडण्यात आला. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वनजमिनीच्या मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली. अंबरनाथ पश्चिमेकडील एकमेव मोठा विसर्जन घाट असलेल्या चिंचपाडा खदानमधील साचलेला गाळ उपसा करून खदानाची साफसफाई करणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षाविषयक कामे करण्यासाठी वन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणि आवश्यक मान्यता मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे या सर्व विषयांवर नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा करून लेखी निवेदनही सादर केले. अंबरनाथच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे प्रश्न प्रलंबित न ठेवता त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. 

यावेळी अंबरनाथ नगरपालिका भाजपा गटनेते तथा नगरसेवक अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील, नारी शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे, BLO-1 अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे संतोष शिंदे, अंबरनाथ पश्चिम मंडळ-1चे अध्यक्ष लक्ष्मणदत्त पंत, श्री सोमेश्वर मंडळाचे अध्यक्ष श्रीमान जाधव आदी उपस्थित होते. यावेळी अंबरनाथ शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या या विषयांवर वन विभागाकडून सकारात्मक निर्णय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |