Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

डोंबिवलीत मातृगौरव पुरस्काराने उषा मुंडे सन्मानित ; पाथर्ली येथील शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम

१८ वर्षांची गौरवशाली परंपरा कायम

डोंबिवली (विनोद वास्कर ) दि. २७ : सामाजिक क्षेत्रात निःस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या माता-भगिनींच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पाथर्ली, डोंबिवली येथील शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून मातृगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यंदाचा मातृगौरव पुरस्कार २०२६ सामाजिक कार्यकर्त्या कु. उषा बाळाराम मुंडे यांना प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यालयाच्या तळमजल्यावर मातृगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती निर्मलाताई श्रीधर म्हात्रे होत्या. तर श्री समर्थ कृपा संजीवन चिकित्सालयाचे डॉ. नितीन के. जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या रणरागिणी, त्यांचे कुटुंबीय, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिद्द, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीतून उल्लेखनीय कार्य

उषा मुंडे या ७० टक्के दिव्यांगत्वावर मात करत जिद्द, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्या आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या संस्थापिका-अध्यक्षा असून त्यांचे कार्यालय आगासन गाव, दिवा (पूर्व) येथे आहे.

सन २००६ पासून अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या उषा मुंडे यांनी सन २०१४ पासून आतापर्यंत ४६ महिला बचत गटांची स्थापना केली आहे. त्यांच्या माध्यमातून ३०० हून अधिक महिलांना शिवणकाम, ब्युटी पार्लर, एम्ब्रॉयडरी आदी कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच मोफत आरोग्य शिबिरे, आधार व ई-श्रम नोंदणी शिबिरे आयोजित करून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य केले आहे. महिलांवरील अत्याचार आणि बालविवाहाच्या विरोधातही त्या सातत्याने जनजागृतीचे कार्य करीत आहेत.

विविध पुरस्कारांनी यापूर्वीही गौरव

उषा मुंडे यांच्या सामाजिक कार्याची यापूर्वीही विविध संस्थांनी दखल घेतली आहे. त्यांना महाराष्ट्र आस्था गौरव २०२३, समाजरत्न, सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२४, नारीशक्ती पुरस्कार २०२५, सुवर्णरत्न पुरस्कार २०२५ आणि रोटरी क्लब नारी शक्ती पुरस्कार २०२६ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मातृगौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आल्याने त्यांच्या सामाजिक कार्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन उषा मुंडे यांचा गौरव करण्यात आला.

उषा मुंडे यांच्या कार्यातून दिव्यांगत्व ही मर्यादा नसून जिद्द, इच्छाशक्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल तर अनेक सकारात्मक बदल घडवून आणता येतात, असा प्रेरणादायी संदेश समाजासमोर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |