डोंबिवली ( शंकर जाधव ) : दरवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्रद्धा, उत्सव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न 'एकदंता टीमकडून केला जातो. यंदाही समाजातील एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील 'एस.टी.डेपोची सद्यस्थिती आणि प्रवाशांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव' हा विषय मांडण्यात आला आहे.
महाराष्ट्राची ‘लाल परी’ही राज्याच्या कानाकोपऱ्याला जोडणारी जीवनवाहिनी आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात हजारो नागरिक आपल्या गावी, आपल्या माणसांकडे जाण्यासाठी एस.टी. बसचा आधार घेतात. सर्वसामान्यांसाठी परवडणारी आणि सहज उपलब्ध असलेली ही वाहतूक व्यवस्था आजही लाखो नागरिकांच्या प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे.मात्र, एस.टी. बससेवा वाढविण्याबरोबरच ज्या डेपोतून हा प्रवास सुरू होतो, त्या डेपोची अवस्था आणि प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
अनेक एस.टी. डेपोमध्ये आजही स्वच्छता, प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, कॅन्टीन आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक प्रवासी १०–१२ तासांचा प्रवास करतात. या प्रवासात महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबांसाठी स्वच्छ स्वच्छतागृह, सुरक्षित प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी आणि स्वच्छ अन्न या सुविधा अत्यंत आवश्यक आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या सजावटीच्या माध्यमातून एकदंता टीमचा प्रयत्न आहे की, या सुविधा कोणत्याही प्रकारच्या चैनीच्या नसून प्रत्येक प्रवाशाच्या मूलभूत गरजा आहेत हा संदेश समाजापर्यंत पोहोचाव स्वच्छ आणि आरोग्यदायी एस.टी. डेपो, स्वच्छ व आरामदायी प्रतीक्षालय,स्वच्छ आणि वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे,महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी योग्य सुविधा,स्वच्छ पिण्याचे पाणी स्वच्छ व परवडणारे कॅन्टीन,योग्य कचरा व्यवस्थापन आणि परिसराची नियमित स्वच्छता अशा या प्रमुख मागण्या आहेत.हा उपक्रम कोणत्याही राजकीय पक्ष, संस्था किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही. हा केवळसर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी केलेला एक नम्र प्रयत्न आणि आवाहन असे म्हणणे आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेशांची परंपरा असून एकदंता टीमने यापूर्वीही गणेशोत्सवाच्या सजावटीच्या माध्यमातून विविध सामाजिक विषय मांडले आहेत.टोकियो ऑलिम्पिक्सच्या माध्यमातून क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा आणि आपल्या भारतीय खेळाडूंचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात आला.त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळची प्रतिकृती साकारून वाढत्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध कर्करोग उपचारांची गरज अधोरेखित करण्यात आली.यानंतर 'एक सोसायटी, एक गणपती मंडळ’ या संकल्पनेतून सामाजिक एकतेकडे लक्ष वेधण्यात आले आणि गणेशोत्सवाचा मूळ उद्देश एकत्र येणे आणि समाजाला जोडणे जपण्याचा संदेश देण्यात आला.
मागील वर्षी 'रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा' विषय मांडण्यात आला. दररोजच्या प्रवाशांना होणारा त्रास, गर्दी आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता फेरीवाल्यांसाठी स्थानकापासून किमान १५० मीटर अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले होते.
यंदाचा विषय त्याच सामाजिक प्रवासातील पुढचा टप्पा असून महाराष्ट्राच्या एस.टी. डेपोच्या सुधारणेचा आहे.'आपली लाल परी, आपला अभिमान'महाराष्ट्राची लाल परी राज्याला जोडते. आता तिचे डेपोही स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांनी परिपूर्ण व्हावेत, हीच यंदाची अपेक्षा आहे.
यंदा बाप्पाच्या चरणी आमची एकच प्रार्थना अशी की “महाराष्ट्राची लाल परी महाराष्ट्राला जोडते; आता तिचे एस.टी. डेपोही स्वच्छ, सुंदर आणि सुविधांनी परिपूर्ण होऊ देत.सोसायटी / टीम (एकदंता टीम) संकल्पना व विचार -रुपेश राऊत व हर्षद उकर्डे, कलाकार- महेश निंमणकर,वैभव रोडे,राहुल दळवी,एसटी बस - पवन भगवान कोळी,डायोरामा आकार ६ फूट रुंदी × १.५ फूट उंची,पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी ७ दिवस तसेच सहकार्य करणारी टीम पल्लवी राऊत, सायली रोडे,अश्विनी सुशांत भोवड,प्राजक्ता प्रवीण केळुसकर,तेजश्री मंगेश तेली,तृप्ती अभिजीत बिल्ले, सोनाली उकर्डे,अवनी हर्ष सोलंकी अशी आहेत.
एकदंता टीम – डोंबिवलीरुपेश राऊत वय ३५ वर्षे, डोंबिवली येथील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव दापोली, रत्नागिरी आहे. एकदंता टीमच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सवाच्या सजावटीतून सामाजिक विषय मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.डोंबिवली आणि कोकणाशी असलेले नाते लक्षात घेता, यंदाचा एस.टी.चा विषय विशेष महत्त्वाचा आहे. कारण एस.टी. ही केवळ शहरांना जोडणारी वाहतूक व्यवस्था नसून महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना त्यांच्या मातीशी, गावाशी आणि माणसांशी जोडणारी ‘लाल परी’आहे.
