डोंबिवली ( शंकर जाधव ) : लंडन मधील महाराष्ट्र मंडळाचं प्रशस्त सभागृह ... त्यात १६ x ८ फुटांचं मोठं स्टेज ... मध्यभागी विराजमान असलेली गणरायाची साडेतीन फुटी देखणी मूर्ती .... या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार चार सुशोभित पॅनेल्स.... या आठ पॅनेल्सवर गणेशभक्तांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अष्टविनायकांच्या प्रतिमा... लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या यंदाच्या (२०२६) गणेशोत्सवाची ही आकर्षक सजावट साकारण्याचं भाग्य मला आणि स्मिताला यंदा लाभलं ते खरंतर लंडनमधला आमचा मित्र जैलेश देशपांडे याच्यामुळे .
जैलेश देशपांडे हा मूळचा डोंबिवलीकर . संदीप वैद्यमुळे आमची ओळख झाली . त्या ओळखीतून त्याने माझ्याशी संपर्क साधला आणि अष्टविनायक ही कल्पना घेऊन सजावट करायची आहे , तुला हे जमेल का अशी विचारणा केली.महाराष्ट्र मंडळ , लंडन चे अध्यक्ष श्री वृषाल खांडके , माजी ( संस्थापक) अध्यक्ष श्री सुधाकर खुरजेकर आणि जैलेश देशपांडे यांच्याशी फोनवरून चर्चा होत होती.( श्री खुरजेकर काका आणि जैलेश देशपांडे यांनी १९९१ मध्ये या उत्सवाला सुरुवात केली . यंदा या उत्सवाचं ३६ वं वर्ष आहे.) जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात हे काम करायचं नक्की झालं . तेव्हापासून ते राखीपौर्णिमेला इथून संपूर्ण देखावा पॅक करून प्रत्यक्ष रवाना होईपर्यंत सलग तीन आठवडे कामाची खूपच गडबड सुरू होती. मुख्य व्यासपीठ सोळा फूट लांब आणि आठ फूट रुंद . त्यावर जवळपास पाच ते सहा फूट उंच असा देखावा उभा करायचा होता . छोट्या मॉडेलने आम्ही सुरुवात केली.ते मॉडेल त्यांना आवडलं . त्यावर थोडी चर्चा झाली आणि मग प्रत्यक्ष काम सुरू झालं .सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सम्पूर्ण सजावट पर्यावरण-स्नेही म्हणजे इकोफ्रेंडली असेल यावर त्यांचा आणि आमचा कटाक्ष होता .
देवाच्या मागे मुख्य गाभारा आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार पॅनेल्सवर अष्टविनायक अशी ही रचना होती . दीड फूट रुंद आणि साडेचार फूट लांब अशा लाकडी चौकटीवर एमडीएफ ठोकून प्रत्येक पॅनल उभं केलं . या आठ पॅनेल्सवर पुठ्ठा आणि हॅन्डमेड कागद याच्या साहाय्याने सजावट केली . गाभाऱ्यावरील नगारखाना सजवताना त्यात कापडी पडद्यांचा वापर केला. मराठी मुलुखाचा देखावा वाटावा यासाठी लाल हॅन्डमेड पेपर वापरून त्यात चिरेबंदी काम दाखवलं आहे . प्रत्येक पॅनेलवर त्या त्या स्थळाचं आणि देवाचं नाव यात्रेच्या क्रमानुसार येईल याची काळजी घेतली . खाली तळाशी शिल्पांची सजावट असलेलं चिरेबंदी काम आणि वरती उजळलेला छज्जा या स्वरूपात ही पॅनेल्स सजवली आहेत.अष्टविनायक यात्रेचा क्रम ठरलेला आहे.मोरगावच्या श्री मोरेश्वराच्या दर्शनाने यात्रा सुरू करायची आणि उर्वरित सात गणपतींच्या दर्शनानंतर पुन्हा एकदा मोरगावला येऊन यात्रा समाप्ती करावी असा संकेत आहे . मांडणी करताना या क्रमाचा विचार करूनच पॅनेल्सवर क्रमांक टाकले होते ) मूळ डिझाईन मी केलं . स्मिता व्यवसायानं इंटिरिअर डिझायनर असल्याने तिने हे सर्व डिझाईन स्टेजवर मापात बसवण्यासाठी त्यांची कागदावर प्लॅन काढून मांडणी केली.अष्टविनायकांच्या छपाईच्या दृष्टीने उत्तम प्रतिमा हव्या होत्या . त्या प्रतिमा मिळवणं , त्याचबरोबर आमचं सर्व डिझाईन लेझर कटिंगसाठी संगणकावर उतरवणं हे काम ऍड श्री हरीश चव्हाण यांनी केलं.हे सगळं कोरीव काम लेसर कटिंगद्वारे करण्यात आलं . त्यासाठी आमचे मित्र श्री भगवान भंडारी यांनी खूपच परिश्रम घेतले. पॅनेल्स लाकडी चौकटीवर ठोकून व्यवस्थित बसविण्यात आमचा तरुण मित्र रोहन ढवळे याची मदत झाली. मुख्य गाभाऱ्यात , मूर्तीच्या मागे असलेल्या भिंतीवर तरुण सुलेखनकार उमेश पांचाळ याने अष्टविनायकांचा श्लोक कॅलिग्राफी करून लिहिला. त्याने त्या गाभाऱ्याला एक वेगळी प्रसन्नता आली.जवळपास तीन आठवडे आमच्या रोजच्या कामातून वेळ काढून , आम्हा दोघांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही कलाकृती बनत गेली . प्रत्येक सुटा भाग इथे व्यवस्थित दिसत असला तरी प्रत्यक्ष जोडणी लंडनमध्ये होणार होती . ती जोडणी तिकडच्या मंडळींना सहजपणे करता येईल असं डिझाईन करणं हे यातलं खरं आव्हान होतं . त्यादृष्टीने प्रत्येक भागावर तपशीलवार नोंद करणं आवश्यक होतं . या सर्व सूचना प्रत्येक पार्ट वर नीट लिहिलेल्या होत्या. २५ ऑगस्टला सर्व सुटे भाग आम्ही काळजीपूर्वक पॅक केले . मोठमोठी २१ पॅकेट्स तयार झाली . हे पॅकिंग करायलाच आम्हाला जवळपास दहा ते बारा तास लागले . प्रत्येक बॉक्स किंवा पॅक मधील सामानाचा सर्व तपशील स्मिताने लिहून काढला . त्याची एक स्वतंत्र यादी व्हाट्सएपच्या माध्यमातून लंडनला पाठवली होती."पेस कुरियर" ची मंडळी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या घरी येऊन ही सर्व पॅकेट्स घेऊन गेली तेव्हा माझ्या आणि स्मिताच्या मनात काहीशी हुरहूर होती . कार्यपूर्तीचा आनंद होताच शिवाय या पॅकेट्सचा लंडन पर्यंतचा प्रवास कसा होईल याची थोडी कळजीसुध्दा होतीच.
एखादं पॅकेट सुद्धा इकडे तिकडे होऊन चालणार नव्हतं . मात्र लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री वृषाल खांडके यांनी सर्व नियोजन व्यवस्थित केलेलं होतं . त्या नियोजनामुळे आणि गणरायाच्या कृपेने पुढच्या चारच दिवसांत ही पॅकेट्स इच्छित स्थळी सुखरूप पोचली.त्यानंतर जैलेश , खुरजेकर काका यांचे आणि आमचे व्हिडीओ कॉल्स सुरू झाले . सर्व तपशील आणि नकाशा त्यांच्या हातात होताच . त्यातून सर्व देखावा त्यांनी उत्तम प्रकारे जोडून उभा केला . मंडळाच्या मागणीनुसार स्टेजचा दर्शनी भाग , पूजेच्या मूर्तीच्या टेबलाची सजावट याचीही सोय आम्ही केलेली होती . तेही व्यवस्थित लागलं . एकेक भाग जुळत गेला तसतसं आमचं टेन्शन कमी होत गेलं. प्रत्यक्ष " श्रीं"ची मूर्ती तिथे विराजमान झाली तेव्हा खरोखरच समाधान वाटलं. मूळचा कल्याणकर असल्याने कॉलेजला असताना सुभेदार वाडा गणेशोत्सवात कार्यकर्ता म्हणून काम केलं होतं . तिथे सुप्रसिद्ध आर्टिस्ट श्री राम जोशी यांच्या हाताखाली अशा कामाचं ट्रेनिंग झालेलं होतं . गेली कितीतरी वर्षं मखरं विक्रीचा अनुभव गाठीशी आहे . अनेक चांगल्या कलाकारांनी बनवलेली मखरं जोडलेली असल्याने चांगली जोडणी कशी असावी हेही कुठेतरी मनात होतं मा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लंडनमध्ये या गणपतीचं दर्शन घेतले अशी माहिती डोंबिवली गद्रे बंधू यांनी दिली.
