इयत्ता चौथीतील १६ आणि सातवीतील ३ विद्यार्थ्यांचा गौरव; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
ठाणे : जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी क्रमांक १ मध्ये ‘A’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा आज, दि. २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी जिल्हा परिषद मुख्यालयातील सभागृहात सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन देऊन गौरविण्यात आले. तसेच संबंधित शाळांना शैक्षणिक साहित्याचे किट प्रदान करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात इयत्ता चौथीतील १६ आणि इयत्ता सातवीतील ३ अशा एकूण १९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणे, शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करून घेणे आणि स्पर्धा परीक्षांमधून त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे, हा मिशन भरारी उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत ओपन लिंक फाउंडेशन (विनोबा) संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, गटशिक्षणाधिकारी, विनोबा येथील विभागीय व्यवस्थापक श्रीकांत सावंत, प्रकल्प व्यवस्थापक माणिक गायकवाड, विनोबा टीम, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधला. विद्यार्थ्यांशी गप्पा मारत त्यांच्या अभ्यासाची पद्धत, सराव परीक्षेचा अनुभव आणि पुढील शैक्षणिक उद्दिष्टे यांविषयी जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा, आगामी सराव परीक्षांसाठी अधिक चांगली तयारी करावी आणि मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे त्यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करून, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले. आगामी सराव चाचण्यांमध्ये ‘A’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत सराव परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद मुख्यालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणेची कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली.
जिल्हा परिषद शाळा, म्हसा, ता. मुरबाड येथील विद्यार्थिनी मृगाक्षी राणे हिने मनोगत व्यक्त करताना सराव परीक्षेमुळे अभ्यासाला नवी दिशा मिळाल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळा, आल्याणी, ता. शहापूर येथील विद्यार्थिनी प्रांजली सापळे हिने सराव परीक्षेमुळे अभ्यास करण्याची आणि स्वतःची तयारी तपासण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या दृष्टीने मिशन भरारी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
