दिवा पश्चिम, साबे गाव रोड व साबे गाव परिसरातील मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत जोडण्यांवर पालिका प्रशासनाची धडक कारवाई
नगरसेवक अॅड. आदेश भगत यांच्या मागणीला यश
दिवा : दिवा परिसरातील पाणीटंचाईला कारणीभूत ठरणाऱ्या बेकायदेशीर जलजोडण्यांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. दिवा पश्चिम, दिवा स्टेशन रोड, साबे गाव रोड आणि साबे गाव परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत कनेक्शन करून पाण्याची विक्री केली जात असल्याच्या प्रकरणी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक बेकायदेशीर कनेक्शन खंडित करण्यात आले.
यापूर्वी दिवा गाव आणि दिवा पश्चिम परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर बेकायदेशीर कनेक्शन करून पाणी विक्री केल्याच्या प्रकरणात तब्बल ६२ पंप जप्त करण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा उपअभियंता सुरेश वाघिरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनधिकृत जलजोडण्या करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दिवा पश्चिम, दिवा स्टेशन रोड, साबे गाव रोड आणि साबे गाव परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जोडण्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या जोडण्यांचा वापर करून पाण्याची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अशा अनधिकृत जोडण्यांमुळे नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक २७ मधील कृत्रिम पाणीटंचाईसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कथित पाणी माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अॅड. आदेश भगत यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. तसेच, नुकत्याच झालेल्या प्रभाग समितीच्या सर्वसाधारण सभेतही त्यांनी पाणीमाफियांचा प्रश्न ठामपणे उपस्थित करून अनधिकृत कनेक्शनवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मध्ये बेकायदेशीर जलजोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आगामी काळातही अशा अनधिकृत जोडण्यांवर कारवाई सुरू राहणार का आणि दिवा परिसरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
