Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे महापालिकेच्या विकासकामांना गती द्या; आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

दिवा रेल्वे उड्डाणपूल तसेच दिवा-शीळ रस्त्याच्या कामांचा सविस्तर आढावा

प्रलंबित अडचणी दूर करून प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करा

निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाईचा इशारा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रकल्प संनियंत्रण बैठकीत घेतला. शहरातील विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रलंबित अडचणी तातडीने दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजिवडा येथे स्थलांतर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे नूतनीकरण, के. व्हिला नाल्यावरील पूल, नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, दिवा रेल्वे उड्डाणपूल तसेच दिवा-शीळ रस्त्याच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून नियोजनानुसार प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

विकासकामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. कामांचा दर्जा राखणे, निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करणे आणि कामाच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासोबतच शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता आयुक्तांनी अधोरेखित केली. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, यासाठी प्रभावी नियोजन आणि नियमित संनियंत्रण करावे, असे निर्देशही देण्यात आले.

ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |