ठाणे, : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने श्री. विनोद पाटील यांना प्रदान करण्यात आलेला ‘ठाणे गौरव पुरस्कार’ तातडीने मागे घेऊन या पुरस्काराची प्रतिष्ठा व विश्वासार्हता कायम ठेवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
दिवा परिसरातील अनधिकृत शाळांच्या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात आलेली असून, याच प्रकरणासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे FIR क्र. 0694/2023, दिनांक 04/07/2023, कलम 188 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. सदर प्रकरणाशी संबंधित व्यक्तीचे नाव समोर आलेले असताना त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ‘ठाणे गौरव पुरस्कार’ देण्यात आल्याने पुरस्काराच्या निवडीबाबत प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
‘ठाणे गौरव पुरस्कार’ हा केवळ एखाद्या व्यक्तीचा सन्मान नसून ठाणे शहराच्या प्रतिष्ठेशी आणि महानगरपालिकेच्या विश्वासार्हतेशी संबंधित आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीविषयी गंभीर स्वरूपाचे प्रकरण प्रलंबित असल्यास त्याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक आहे, अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली.
यावेळी निवेदन स्वीकारताना ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती निवेदनकर्त्यांनी दिली.
यावेळी कल्याण लोकसभा जिल्हा संघटक रविंद्र सुर्वे, कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास बामा मुंडे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, कळवा शहरप्रमुख लहू चालके, दिवा उपविभागप्रमुख शशिकांत कुंभारगण आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि चौकशीत संबंधित व्यक्तीविरुद्ध आक्षेप सिद्ध झाल्यास ‘ठाणे गौरव पुरस्कार’ाबाबत नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
