४८ वर्षांची गौरवशाली परंपरा - यंदा बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू
ठाणे - ठाणे शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात मानाचे स्थान असलेल्या टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाही ‘आई दुर्गेश्वरी’च्या दर्शनासाठी लाखो भाविकांची पावले टेंभी नाक्याकडे वळणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरु केलेला हा उत्सव त्यांच्या पश्चात शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम असलेल्या या उत्सवाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. १९७८ मध्ये सुरू झालेल्या या नवरात्रोत्सवाने तब्बल ४८ वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, काळ बदलला तरी टेंभी नाक्यावरील देवीप्रती असलेली भाविकांची आस्था आजही तितकीच कायम आहे, अशी भावना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला महापौर शर्मिला पिंपळोलकर, गटनेते पवन कदम, ट्रस्ट चे अध्यक्ष उत्तम सोलंकी, नगरसेवक सुधीर कोकाटे, हेमंत पवार, कमलेश चव्हाण, पूजा वाघ आदी मान्यवर उपस्थित होतें.
टेंभी नाका येथील श्री जय अंबे माँ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला ठाणे शहरापुरते मर्यादित स्वरूप न राहता मुंबई, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या विविध भागांतून भाविक उपस्थित राहतात. नवरात्रोत्सवाच्या काळात टेंभी नाका परिसर अक्षरशः भक्तिमय वातावरणाने भारून जातो.
आनंद दिघेंच्या संकल्पनेतून उत्सवाची मुहूर्तमेढ
टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या इतिहासाला स्वर्गीय आनंद दिघे यांच्या सामाजिक जाणिवेची जोड आहे. १९७८ मध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. काळाच्या ओघात हा उत्सव अधिक व्यापक होत गेला. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत गेली आणि टेंभी नाका हे नवरात्रोत्सवाच्या काळात देशातील प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. दिघे साहेबांच्या पश्चात एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा केला जात आहे.
‘आई दुर्गेश्वरी’वर भाविकांची अपार श्रद्धा
टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘आई दुर्गेश्वरी’ची भव्य आणि मनोहारी मूर्ती. देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत भाविकांची मोठी गर्दी होत असते. देवीचे दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. देवीच्या मूर्तीला असलेले पारंपरिक स्वरूप आणि त्यामागील श्रद्धा यामुळे टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ही भाविकांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक वर्षानुवर्षे नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात.
यंदा बद्रीनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती
यंदाच्या नवरात्रोत्सवाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे मंडपाची भव्य सजावट. उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती यंदा साकारण्यात येत असून, भाविकांसाठी हा देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीची भव्यता आणि आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण परिसराला नवरात्रोत्सवाचे वेगळे रूप प्राप्त होणार आहे. ७१ फूट उंच, १०० फूट रुंद आणि ११० फूट लांबी असलेला हा भव्य देखावा आहे. देखाव्याच्या आतल्या बाजूस ३० फुटांची उंची असून देवीचा गाभारा ४० बाय ४० फूट आहे. ५१ खांबांवर हा भव्य देखावा साकारला गेला आहे. २१ दिवस साईटवर आणि प्रत्यक्ष जागेवर मिळून देखावा साकारण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला आहे. जवळपास ३५० कारागिरांनी मिळून या देखाव्याला आकार दिला आहे. ज्येष्ठ कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बद्रीनाथ मंदिराची निर्मिती होत आहे.
नऊ दिवस भक्तिमय वातावरण
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीची विविध धार्मिक पद्धतीने पूजा-अर्चा केली जाते. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू होते. संध्याकाळच्या वेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. परिसरात होणारी विद्युत रोषणाई, धार्मिक कार्यक्रम आणि भक्तिगीतांमुळे वातावरण अधिकच भक्तिमय होते.
आई जगदंबेच्या मंगलमय दर्शनासाठी आपण सहकुटुंब अवश्य यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मंडळाचे अध्यक्ष उत्तमचंद सोळंकी, सचिव हेमंत पवार, उपसचिव सुधीर कोकाटे, खजिनदार कमलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकर्ते, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेनेचे कार्यकर्ते उत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत.
