फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई होत नसेल, तर नगरसेवकांनी राजीनामे देऊन घरी बसावे; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांची जोरदार टीका
दिवा : दिवा शहरातील फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण, नागरिकांना होणारा त्रास आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना आलेले अपयश यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी दिवा प्रभाग समितीतील ११ नगरसेवकांवर जोरदार टीका केली आहे.
दिवा विभागातील विविध प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यांबाबत महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दिव्यातील वाढत्या फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दिवा शहर फेरीवाला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तातडीने ठोस कारवाई करावी, अशा सूचना महापौरांकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र, दिव्यातील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग समितीतील ११ नगरसेवकांना एकत्र येऊन महापौरांची भेट घ्यावी लागते आणि स्वतंत्र बैठक आयोजित करावी लागते, ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशी टीका ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली.
यासंदर्भात बोलताना ॲड. मुंडे म्हणाले की, दिव्यातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षांपासून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते, पदपथ आणि नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असे असताना स्थानिक नगरसेवकांना हा प्रश्न सोडवण्यासाठी महापौरांकडे धाव घ्यावी लागत असेल, तर स्थानिक पातळीवर महापालिका प्रशासनावर त्यांचा प्रभावी अंकुश आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
काही नगरसेवक दोन-दोन, तीन-तीन वेळा निवडून आलेले आहेत. त्यांना दिव्यातील नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न अद्याप सोडवता आलेला नसेल, तर त्यांच्या लोकप्रतिनिधित्वाचा उपयोग काय? निवडणुकीच्या वेळी नागरिकांकडे मते मागायची आणि निवडून आल्यानंतर त्याच नागरिकांना रोजच्या समस्यांशी झुंज द्यायला लावायचे, ही भूमिका योग्य नाही. फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार बैठका घेण्याऐवजी प्रत्यक्ष कारवाई करून नागरिकांना दिलासा देणे ही नगरसेवकांची जबाबदारी आहे, असेही ॲड. मुंडे यांनी स्पष्ट केले.
दिवा शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. महापालिका प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारवाई करावी. वारंवार संधी मिळूनही नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यात अपयश येत असेल, तर अशा नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करून तातडीने राजीनामे द्यावेत आणि घरी बसावे, अशा शब्दांत ॲड. रोहिदास मुंडे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
दिव्यातील नागरिकांना अतिक्रमणमुक्त रस्ते, मोकळे पदपथ आणि सुरक्षित वाहतूक मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे महापौरांनी दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करून दिव्यातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड, माजी उपमहापौर व नगरसेवक रमाकांत मढवी, बाबाजी पाटील, शैलेश पाटील, नगरसेविका दर्शना म्हात्रे, साक्षी मढवी, स्नेहा पाटील, दीपाली भगत, अर्चना पाटील तसेच विभागप्रमुख निलेश पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
