कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) दहा प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी बुधवारी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत शिवसेनेने पाच प्रभाग समित्यांवर विजय मिळवत वर्चस्व कायम राखले. भाजपने चार, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एका प्रभाग समितीच्या सभापतीपदावर बाजी मारली. त्यामुळे सभापतीपदांच्या निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला.
काही प्रभागांत बिनविरोध निवड
दहा प्रभाग समित्यांपैकी ‘अ’, ‘ड’ आणि ‘फ’ या प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी बिनविरोध निवड निश्चित झाली होती. उर्वरित प्रभाग समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र, काही ठिकाणी उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने तेथेही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
‘क’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी भाजपच्या मेघाली खेमा, शिवसेनेचे प्रतीक पेनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे रमीज मणियार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रतीक पेनकर आणि रमीज मणियार यांनी माघार घेतल्याने भाजपच्या मेघाली खेमा यांची बिनविरोध निवड झाली.
‘ह’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी भाजपच्या रवीना म्हात्रे, मनसेचे संदेश पाटील आणि शिवसेनेच्या रेखा म्हात्रे यांनी अर्ज दाखल केले होते. संदेश पाटील आणि रेखा म्हात्रे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या रवीना म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली.
‘ग’ प्रभाग समितीत भाजपच्या कविता म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे सूरज मराठे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच ‘इ’ प्रभाग समितीत भाजपच्या रवीना माळी यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
‘ब’ आणि ‘आय’ प्रभाग समित्यांमध्ये चुरस
‘ब’ प्रभाग समितीच्या सभापतीपदावर शिवसेनेच्या सुप्रिया भोईर यांनी विजय मिळवला, तर ‘आय’ प्रभाग समितीच्या सभापतीपदावर भाजपच्या सरोज राय यांनी बाजी मारली. या दोन्ही प्रभाग समित्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांना यश मिळवता आले नाही.
प्रभागनिहाय नवनिर्वाचित सभापती‘अ’ प्रभाग समिती – बंदेश जाधव (शिवसेना), ‘ब’ – सुप्रिया भोईर (शिवसेना), ‘क’ – मेघाली खेमा (भाजप), ‘ड’ – शीतल मंढारी (मनसे), ‘इ’ – अर्जुन पाटील (शिवसेना), ‘फ’ – मंदा पाटील (भाजप), ‘ग’ – सूरज मराठे (शिवसेना), ‘ह’ – रवीना म्हात्रे (भाजप), ‘आय’ – सरोज राय (भाजप) आणि ‘जे’ – दर्शना काळे (शिवसेना).
स्थानिक विकासकामांवर सभापतींची जबाबदारी
प्रभाग समित्यांच्या सभापतींची भूमिका स्थानिक पातळीवरील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि महापालिका प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटार व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित सभापतींवर असेल. त्यामुळे आगामी काळात प्रभागांमधील विकासकामांना गती देणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, हे सभापतींसमोरील प्रमुख आव्हान ठरणार आहे.
