Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

साबे भागात प्रथम अधिकृत पाणीपुरवठा सुरू करा, त्यानंतरच नळजोडण्यांवर कारवाई करा !

नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांची ठाणे महापालिकेच्या महासभेत मागणी

साबे भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नवीन आराखडा तयार करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

दिवा (प्रतिनिधी) : दिवा शहरातील साबे भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत उपस्थित केला. ज्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकृत पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होत नाही, त्या ठिकाणी प्रथम अधिकृत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी आणि त्यानंतरच अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.

साबे परिसरातील अनेक नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची बाब मांडताना अर्चना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रभागातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्याची विनंती केली. ज्या ठिकाणी पाण्याचे मीटर बसवण्यात आले आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, संबंधित भागात प्रत्यक्ष पाणीपुरवठा होतो की नाही आणि कोणत्या परिसरात पाणी पोहोचत नाही, याची तपासणी प्रशासनाने केली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘आधी प्रत्यक्ष परिस्थिती पाहा, मगच कारवाई करा’

महासभेत बोलताना अर्चना पाटील यांनी केवळ कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साबे परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, असे स्पष्ट केले. नागरिकांना पाणी मिळत नसताना त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून नळजोडण्यांवर कारवाई करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम ग्राउंड लेव्हलवर नेमकी परिस्थिती काय आहे, हे समजून घेऊन त्यानुसार उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पाणीपट्टी भरूनही टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ

साबे भागातील नागरिकांना महापालिकेच्या पाईपलाईनमधून पुरेसा पाणीपुरवठा होत नसतानाही पाणीपट्टी भरावी लागत असल्याचा मुद्दा अर्चना पाटील यांनी उपस्थित केला. त्यातच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नागरिकांना टँकरद्वारे किंवा अन्य पर्यायांतून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे साबे भागातील अंतर्गत पाईपलाईनची व्यवस्था योग्य पद्धतीने करून अधिकृत पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली.

अनधिकृत नळजोडण्यांवरील कारवाईबाबत प्रशासनाला सवाल

साबे भागात अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यापूर्वी नागरिकांना मुबलक आणि नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे नेमके धोरण काय आहे, असा प्रश्नही अर्चना पाटील यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठ्याची अधिकृत व्यवस्था नसलेल्या भागात प्रथम आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात आणि त्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करावी, असे त्यांनी नमूद केले.

महापालिकेने अधिकृत पाईपलाईनद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू केल्यास नागरिकांची टँकरवरील अवलंबित्वाची गरज कमी होईल आणि पाणीटंचाईच्या समस्येतून दिलासा मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांकडून पाहणी व नवीन आराखड्याचे आश्वासन

नगरसेविका अर्चना पाटील यांनी मांडलेल्या मागणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी साबे विभागाची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच परिसरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती तपासून नव्याने आराखडा तयार करण्यात येईल आणि त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता महापालिका प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी कधी केली जाते, नवीन आराखड्याची अंमलबजावणी कितपत लवकर होते आणि साबे भागातील नागरिकांना नियमित अधिकृत पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |