कांदळवनाच्या नुकसानीसह वाहतूक कोंडी, पूरस्थिती व रेल्वे सुरक्षेचा मुद्दा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन
मुंब्रा : मुंब्रा येथील ‘चुवा पूल’ परिसरात कांदळवन क्षेत्रावर सुरू असलेल्या अवैध माती व कचरा भरणीच्या गंभीर प्रश्नावर बुधवारी मंत्रालयात महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अवैध डम्पिंगमुळे कांदळवनाचे होणारे पर्यावरणीय नुकसान, मुंब्रा-दिवा मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी, स्थानिक नागरिकांच्या जनजीवनावर होणारा परिणाम तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थिती आणि रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुंब्रा-कौसा मंडल अध्यक्षा श्रीमती नाझिया तांबोळी यांनी यापूर्वी या संदर्भात निवेदन देऊन चुवा पूल परिसरातील अवैध डम्पिंग तात्काळ बंद करण्याची तसेच संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रश्नाची गंभीरता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
चुवा पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर माती व कचरा टाकण्यात येत असल्याने कांदळवन क्षेत्राचे नुकसान होत असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. तसेच या परिसरातील नैसर्गिक पाण्याचा निचरा बाधित झाल्यास पावसाळ्यात पाणी साचण्याची आणि संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही उपस्थितांनी निदर्शनास आणून दिले.
याशिवाय मुंब्रा-दिवा जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अवैध माती व कचरा भरणीमुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील परिस्थितीचा भविष्यात रेल्वे वाहतुकीवरही संभाव्य परिणाम होण्याची शक्यता असल्याने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, श्री. मनोहर सुगदरे, श्री. हरून तांबोळी आणि श्री. इलियास यांच्यासह संबंधित उपस्थित होते. उपस्थितांनी चुवा पूल परिसरातील परिस्थिती, पर्यावरणीय नुकसान आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांबाबत आपली भूमिका मांडली.
या सर्व बाबींची दखल घेत महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेत, बैठकीत मांडण्यात आलेल्या मागण्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे मान्य केले. त्यामुळे चुवा पूल परिसरातील अवैध डम्पिंगचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. कांदळवनाचे संरक्षण, स्थानिक नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रश्नावर लवकरात लवकर ठोस कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
