कारिवली ग्रामपंचायतीत संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता उपक्रमांना सुरुवात
ठाणे : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महा श्रमदान दिना’निमित्त भिवंडी तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायतीमध्ये विविध स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
महा श्रमदान दिनानिमित्त ग्रामपंचायत परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या स्वच्छतेसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सेवा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, परिसर साफसफाई आणि वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंडित राठोड, भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर, विस्तार अधिकारी (पंचायत) राजू भोसले, सरपंच, महिला बचत गटांच्या सदस्या, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी, गावातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे तसेच वृक्षसंवर्धन करणे यासाठी नागरिकांनी नियमितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १ ऑक्टोबर रोजी विविध स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत परिसर, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, शाळा परिसर, पाणीपुरवठा स्रोत परिसर आदी ठिकाणी श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या भावनेतून नागरिकांनी स्वच्छता उपक्रमात सहभागी होत स्वच्छ, सुंदर व निरोगी गाव निर्मितीचा संकल्प केला. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती सातत्याने जपण्याची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान दिल्यास स्वच्छ व निरोगी ग्रामपरिसर निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.
