Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दिवाळी साहित्य विक्रीसाठी प्रभाग क्रमांक २९ मध्ये तात्पुरती जागा उपलब्ध करून द्या ! - नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांची मागणी

फुटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमण टाळण्यासाठी नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांची सहाय्यक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

दिवा (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा शहरात वाढत्या अतिक्रमण आणि फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असताना, ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साहित्य व फटाके विक्रेत्यांसाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २९ मधील नागरिकांना दिवाळीचे साहित्य एकाच ठिकाणी खरेदी करता यावे, तसेच फुटपाथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये, या उद्देशाने कार्यरत नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

दिवाळीच्या काळात पणत्या, आकाशकंदील, रांगोळी, सजावटीचे साहित्य तसेच इतर पूजासाहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. याच काळात फटाके आणि दिवाळी साहित्य विक्रीसाठी रस्त्यांच्या कडेला तसेच फुटपाथवर दुकाने थाटली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक २९ मधील विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी केली आहे. यामुळे विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा मिळेल आणि नागरिकांनाही दिवाळीचे आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी खरेदी करणे सोयीचे होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अतिक्रमण रोखतानाच नागरिकांची सोय आणि विक्रेत्यांच्या व्यवसायाचाही विचार करून महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी या मागणीमागील भूमिका आहे. आता सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड या निवेदनावर काय निर्णय घेतात आणि विक्रेत्यांसाठी तात्पुरती जागा उपलब्ध होते का, याकडे प्रभाग क्रमांक २९ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |