Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

३२ वा गोपीकृष्ण संगीत महोत्सव धडाक्यात साजरा

ठाणे - श्री गणेश कल्चरल ॲकॅडमी तर्फे सादर होणाऱ्या गोपीकृष्ण संगीत महोत्सवाचे हे ३२वे वर्ष. ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर संपन्न झालेल्या या महोत्सवात आलेल्या कलाकारांच्या सादरीकरणाने खरंच रसिकांच्या कानाचे आणि डोळ्यांचे पारणे फेडले. दिवाळीच्या फटाक्यांची लडी कशी एकदा सुरू झाली की शेवटपर्यंत कडकडून वाजते आणि सगळा आसमंत त्याने दुमदुमून जातो, तोच अनुभव या वर्षीच्या महोत्सवात आला. आणि त्याला गुरुतत्त्वाचे उदंड आशिर्वाद मिळाले.

पहिल्या दिवशी ३१ ऑक्टोबरला या लडीची सुरूवात भारतातल्या युवा पिढीतील अग्रणी तबलावादक ओजस अधिया यांच्या तबलावादनाने झाली. अजराडा घराण्याचे बारकावे, लयकारी आणि विशेषता दाखवत त्यांनी सुरुवातीलाच कार्यक्रम उच्च पातळीवर नेऊन ठेवला. त्यांना लेहऱ्यावर तितकीच सुरेल आणि लयदार साथ केली होती सुधांशु घारपुरेंनी. आणि हे पहायला ओजसजिंचे गुरू आणि अजराडा घराण्याचे विद्वान् पंडित मृदंगराज जी उपस्थित होते. तत्पश्चात, वयाने ज्येष्ठ परंतु तरुणाईच्या तडफेने कथ्थक नृत्य सादर केले ते श्रीमती दुर्गा आर्या यांनी. त्यांनी सादर केलेल्या विविध उपज रचना, भावांग आणि ओघवती वाणी यामुळे रसिक अक्षरशः मुग्ध झाले. त्यांना तितकीच तोलामोलाची तबलासंगत केली होती तालमणी पं. मुकुंदराज देव आणि रोहित देव यांनी. त्यांच्या जुगलबंदी आणि सवाल - जवाबाने तर उच्चबिंदू गाठला. मुकुंदराज देव हे पंडित मृदंगराज यांचे ज्येष्ठ शिष्य. तब्येतीमुळे जास्त बसवत नसून सुद्धा, "मेरे छोटे बेटे का तबला सुना, लेकीन बडे बेटे का तबला सुनेबिना मैं कही नहीं जाऊंगा", असं सांगत मृदंगराजजी संपूर्ण कार्यक्रम उपस्थित होते. गायन - संवादिनी वर श्रीरंग टेंबे आणि सतारीवर जुबेर शेख यांची संगत अत्यंत पूरक होती.

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर आदरणीय गुरूजी पंडित मृदंगराज जी आणि नुकत्याच "महामहोपाध्याय" उपाधीने सन्मानित झालेल्या नृत्यगुरू डॉ. सौ. मंजिरी देव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्रीराम देव, नरेश म्हस्के, श्रीमती मृणाल पेंडसे, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, लॉबिंडियाचे श्री. भालेराव, टिपटॉप प्लाझाच्या श्रीमती स्मिता शहा आदि मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या दिवशी या सांगीतिक उच्चांकाचा आलेख पुढे न्यायची पहिली मेढ रोवली ती सौ. मंजुषा पाटील यांनी. अत्यंत तयारीच्या, दमसासाच्या आणि स्वच्छ तानांचा पाऊसच पाडला. त्यावर कळस म्हणजे त्यांचे विशिष्ट शैलीने गायलेले जोहार मायबाप जोहार.....! रोहित देव आणि सिद्धेश बिचोलकर यांच्या साथीने आणखीन रंगत वाढवली.
त्यानंतर ज्येष्ठ सरोदवादक पद्मश्री पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांच्या सरोदवादनाने एका वेगळ्याच वादनशैलीचा अनुभव दिला. मोराचे पीस गालावरून हळुवार फिरावे इतकं मुलायम वादन. त्यांना तशीच नजकतदार साथ दिली पंडित मुकुंदराज देव यांनी.

आणि सर्वात शेवटी विधा लाल आणि गौरी दिवाकर यांच्या स्वतंत्र आणि जोड नृत्याने तर यंदाच्या महोत्सवाचा शिरोबिंदू गाठला. उत्तम तयारी, ताळमेळ आणि प्रभावी मांडणी यामुळे कार्यक्रमाची सांगता अतिशय समर्पक पद्धतीने झाली. त्यांना पंडित मुकुंदराज देव आणि रोहित देव यांची झंझावाती तबलासाथ लाभली. महावीर गंगाणी यांनी पखवाज तर वैभव मांकड, श्रीरंग टेंबे आणि जुबेर शेख यांनी अनुक्रमे गायन, संवादिनी आणि सतार यांची उत्तम सांगत केली.

यावर्षी पूर्णत्वाची तृप्ती करून पुढच्या वर्षीच्या महोत्सवाची आस पल्लवित करत या महोत्सवाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |