Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी २९ लाखांची फसवणूक; दोघांना ठाणे शहर सायबर पोलिसांकडून अटक !

व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष; बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे नागरिकाची १,२९,९६,५९३ रुपयांची आर्थिक फसवणूक

आरोपींकडून १५ चेकबुक, १० एटीएम कार्ड, ३४ मोबाईल, २ लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल जप्त.

ठाणे : शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात नफा आणि आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल १ कोटी २९ लाख ९६ हजार ५९३ रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना ठाणे शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप जैस्वाल आणि स्वरराज शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी यांच्याशी आरोपींनी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला होता. त्यानंतर विविध व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेत शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा आणि आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. पुढे फिर्यादींना विशिष्ट ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १,२९,९६,५९३ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास करताना उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या नवी मुंबई येथील बँक खात्याचा संबंध आढळून आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली असता प्रदीप जैस्वाल आणि स्वरराज शर्मा हे दोघे आढळून आले.

पोलिसांनी आरोपींकडून विविध बँकांची १५ चेकबुक व पासबुक, १० एटीएम कार्ड, ३४ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, कंपनीच्या नावाने नोंदणी केलेली KYC कागदपत्रे, उद्यम नोंदणी प्रमाणपत्रे, आधारकार्डसंबंधित कागदपत्रे, POS मशीन तसेच अनेक सिमकार्ड असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन्ही आरोपींना ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री 23.२१ वाजता अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके, सायबर पोलीस ठाणे, ठाणे शहर करीत आहेत.

ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मणेरे तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांच्या पथकाने केली.

नागरिकांनी शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करताना अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुप, संशयास्पद ट्रेडिंग ॲप आणि अवास्तव परताव्याच्या आमिषांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |