दलित तरूणांना मारहाण करणाऱ्यांवर एट्रोसिटी नुसार गुन्हा नोंदवा - मनोज प्रधान
ठाणे - प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या तरूणांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दलित तरूणांना पकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानिषेधार्थ मा. खा. राजन विचारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घोडबंदर रोड परिसरात आंदोलन करण्यात आले होते. या घटनेनंतर काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, पोलीस ठाण्यात नेल्यानंतर आपल्याला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. अर्जुन पुंडगे आणि संकेत कदम या दोघांच्या गुप्तांगावरही मारहाण केली होती. ही मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक यासीन कुरेशी,शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे , गटनेते अभिजीत पवार, मा. नगरसेवक विक्रांत चव्हाण, संजय तरे, प्रकाश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या दहशतीचा जोरदार निषेध केला. मारकुट्या पोलिसांना अटक करा, बेकायदेशीर कोम्बिंग ऑपरेशन करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करा, अशा घोषणा यावेळेस आंदोलकांनी दिल्या. याप्रसंगी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. पोलिस ठाण्यात जाण्यापासून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलकांनी पोलीस स्टेशनच्या दारातच काही काळ ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेत पोलीस उपायुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. तसेच, तपास आपण स्वतः करीत असून सांगळे आणि राठोड या दोन हवालदारांची बदली करण्यात आली आहे, असे कदम यांनी शिष्टमंडळास सांगितले.
दरम्यान, मनोज प्रधान यांनी या दमनशक्तीचा निषेध केला. ते म्हणाले, लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. जर आंदोलनात हिंसक कृत्य झाले तर कायदेशीर मार्गाने कारवाई करावी. पण, यापुढे कुणी आंदोलनच करू नये म्हणून आंदोलकांना बेदम मारहाण करणे ही लोकशाही आहे का? आज आपण हुकूमशाहीमध्ये जगत असल्याची अनुभूती येत आहे. पोलिसांना वाटले म्हणून जर अशी अमानुष मारहाण होत असेल तर आज आपण मोघलाईमध्ये आहोत, असेच स्पष्ट होत आहे. मारहाण झालेले तरूण हे दलित आहेत. त्यामुळे संबधित पोलिसांवर एट्रोसिटी एक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. तर, अविनाश जाधव यांनी, या गुन्ह्य़ातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर थर्ड डीग्री वापरली नाही. मात्र, आंदोलकांवर अशी कृती करण्यात आली. आता आम्ही या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. जर, ही कारवाई झाली नाही तर आमचे आंदोलन सुरूच राहिल. ज्या मुलांवर अश्लील अत्याचार झाले आहेत ते आजारी पडले आहेत. त्यामुळे जर दोन दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी नगरसेवक यासीन कुरेशी,शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे , गटनेते अभिजीत पवार, मा. नगरसेवक विक्रांत चव्हाण, संजय तरे, प्रकाश पाटील, अजय जेया, संगम डोंगरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
