जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा प्रतिबंधात्मक आदेश; ९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ पर्यंत बंदी लागू
ठाणे : जिल्ह्यात विविध ठिकाणी आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात आजमितीस एकूण ११ वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.
काही नागरिकांकडून हवेत उडणारे रॉकेट आणि तत्सम फटाके उडविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे काहीजण थेट हातात रॉकेट धरून धोकादायक पद्धतीने फटाके उडवत असल्याचेही समोर आले आहे. निवासी इमारती, दाट लोकवस्ती, गच्ची, बाल्कनी, वाहनतळ आणि इमारतींमधील रिफ्यूज एरियामधून फटाके उडविले जात असल्याने त्यांच्या जळत्या अवशेषांमुळे इमारतींना आग लागण्याचा धोका वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २६ (२), ३० आणि ३४ (म) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत रॉकेट व तत्सम उडत्या फटाक्यांच्या वापरास प्रतिबंध केला आहे. हा आदेश सार्वजनिक तसेच खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवारे आणि सर्व रहिवासी भागांना लागू राहणार आहे.
९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते ८ जानेवारी २०२७ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन विभागावर सोपविण्यात आली आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सभासदांना या आदेशाची माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० मधील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. आगीच्या दुर्घटना रोखणे आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
