-७५ हजारांहून अधिक खेळाडूंच्या सहभागाचे लक्ष्य; ३२ क्रीडाप्रकार आणि ३५ हून अधिक क्रीडास्थळांवर रंगणार स्पर्धांचा थरार
- ट्रॉफीचे अनावरण, खेळाडूंचा सन्मान आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला रंगत
-पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकविजेते प्रणव देसाई, युवा ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती शौर्या अंबुरे यांचा सन्मान
-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून उपक्रमाचे आयोजन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मैदानावर दुमदुमणारा उत्साह, विविध क्रीडाप्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचे दिमाखदार संचलन, ट्रॉफीचे अनावरण, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा गौरव करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान, महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचा जागर करणारे पोवाड्याचे सादरीकरण आणि कुस्तीच्या आखाड्यात रंगलेला महामुकाबला... अशा भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात ठाणे जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चा शुक्रवारी दिमाखात शुभारंभ झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित या क्रीडासंग्रामच्या उद्घाटन सोहळ्याला खेळाडूंसह क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तब्बल ७५ हजारांहून अधिक खेळाडूंच्या सहभागाचे लक्ष्य असलेल्या या महोत्सवात ३२ विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असून, ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांतील ३५ हून अधिक क्रीडास्थळांवर येत्या २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत विविध स्पर्धांचा थरार रंगणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा महोत्सव एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे.
उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते खासदार क्रीडासंग्रामच्या ट्रॉफीचे अनावरण. यानंतर महोत्सवात समाविष्ट असलेल्या विविध क्रीडाप्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचे दिमाखदार संचलन पार पडले. पारंपरिक भारतीय खेळांपासून ते आधुनिक क्रीडाप्रकारांपर्यंत विविध खेळांतील खेळाडूंनी या संचलनात सहभाग घेतला. खेळाडूंच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने उपस्थितांची मने जिंकली. एकाच व्यासपीठावर विविध खेळ, विविध वयोगटांतील खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर एकत्र आल्याने या सोहळ्याला मिनी ऑलिम्पिकचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच यावेळी कबड्डी, लंगडी, खोखो, कुस्ती यांसाख्या खेळांची देखील सुरुवात करण्यात आली. यावेळी पैलवान दादा शेळके विरुद्ध पैलवान माउली कोकाटे तसेच पैलवान सोनाली मंडलिक विरुद्ध पैलवान विशाखा चव्हाण यांचा कुस्तीचा सामना रंगला.
या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. जपानमध्ये झालेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर T64 प्रकारात कांस्यपदक पटकावणारे ठाण्याचे पॅरा-अॅथलीट प्रणव देसाई आणि डकार येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकणारी शौर्या अंबुरे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंचा सन्मान नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला. चित्रपट अभिनेत्री निम्रत कौर यांची उपस्थितीदेखील सोहळ्याचे आकर्षण ठरली.
महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेचा जागर करणारे पोवाड्याचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. चंद्रकांत माने यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. तसेच संजय शेट्टी समूहाच्या विशेष सादरीकरणाने उद्घाटन सोहळ्याला सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली. संगीत, कला आणि क्रीडा यांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उद्घाटन सोहळ्याला भव्यतेची जोड मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘सांसद खेल महोत्सव’च्या धर्तीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार क्रीडासंग्रामची सुरुवात केली आहे. पहिल्या हंगामाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, कल्याण लोकसभा मतदारसंघासोबतच ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील खेळाडूंनाही या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
आजच्या डिजिटल युगात तरुणाईला मोबाईल आणि सोशल मीडियाच्या विश्वातून प्रत्यक्ष मैदानाकडे आणणे, त्यांच्यात खेळाची आवड निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवरील गुणवंत खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जिद्द विकसित होते. या स्पर्धांमधून पुढे येणाऱ्या गुणवंत खेळाडूंना भविष्यात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे खासदार क्रीडासंग्राम हा केवळ स्पर्धांचा महोत्सव न राहता ठाणे जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविणारा आणि भविष्यातील खेळाडू घडविणारा उपक्रम ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
२० ते २९ नोव्हेंबरदरम्यान रंगणाऱ्या या क्रीडासंग्राममध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दिमाखदार उद्घाटन सोहळा, मान्यवर खेळाडूंचा सन्मान, पारंपरिक कलांचे सादरीकरण आणि कुस्तीच्या थरारक लढतींनी या महोत्सवाची सुरुवातच अविस्मरणीय ठरली असून, आगामी दिवसांत ठाणे जिल्ह्यातील विविध मैदानांवर क्रीडास्पर्धांचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. या उदघाटन सोहळ्याला मंत्री दादा भुसे, उदय सामंत, प्रताप सरनाईक, आमदार डॉ. बालाजी किणीकर, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, रवींद्र फाटक, कुमार आयलानी यांच्यासह शिवसेनेचे चंद्रहार पाटील तसेच ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लहान शहरांतील खेळाडूंनाही मोठे व्यासपीठ मिळावे - खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
खेळाडू घडविण्यासाठी त्यांच्यातील गुणवत्ता आणि मेहनतीसोबतच त्यांना योग्य व्यासपीठ, दर्जेदार प्रशिक्षण आणि आवश्यक क्रीडा सुविधा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः लहान शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये अनेक गुणवान खेळाडू आहेत; मात्र योग्य संधी आणि सुविधांच्या अभावामुळे त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मर्यादा येतात. ही परिस्थिती बदलण्याच्या उद्देशाने खासदार क्रीडासंग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंनाच नव्हे, तर प्रत्येक शहरातील, प्रत्येक परिसरातील आणि अगदी लहान गावांतील खेळाडूंनाही मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली पाहिजे. आज या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमधून उद्या महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणारे खेळाडू घडतील, देशाचे प्रतिनिधित्व करतील आणि भविष्यात क्रीडा क्षेत्राचे नेतृत्व करतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे खासदार क्रीडासंग्राम हा केवळ स्पर्धा आयोजित करण्यापुरता मर्यादित उपक्रम नसून, भविष्यातील क्रीडा नेतृत्व घडविण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे खेळाडूंना निश्चितच मोठा फायदा होईल. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्यातील गुणवत्तावान खेळाडू शोधून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देता येईल.
खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने कल्याण लोकसभा मतदारसंघातही विविध ठिकाणी आधुनिक क्रीडा सुविधा आणि क्रीडा संकुले उभारण्याचे काम सुरू आहे. डोंबिवली येथे देशातील पहिले व्हर्टिकल क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, कळवा येथेही अशाच प्रकारचे बहुउद्देशीय व्हर्टिकल क्रीडा संकुल विकसित करण्यात येत आहे. अंबरनाथमधील शूटिंग रेंज, क्रीडा संकुल आणि तरणतलाव, कल्याणमधील शूटिंग रेंज, उल्हासनगरमधील मिनी स्टेडियम तसेच विविध शहरांतील मैदानांचा विकास अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या शहरातच दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. खेळाडूंना सरावासाठी दूरवर जावे लागू नये, त्यांना आधुनिक सुविधा आपल्या परिसरातच मिळाव्यात आणि स्थानिक पातळीवरूनच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, हा या कामामागील विचार आहे. मात्र, क्रीडा क्षेत्राचा विकास केवळ एका मतदारसंघापुरता किंवा काही शहरांपुरता मर्यादित राहता कामा नये. राज्यातील प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्यात आणि ग्रामीण भागातही खेळाडूंना आवश्यक असलेल्या क्रीडा सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. राज्य सरकारनेही या दिशेने व्यापक नियोजन करून प्रत्येक शहरात विविध खेळांसाठी मैदाने, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, प्रशिक्षण केंद्रे आणि आधुनिक सुविधा उभारण्यावर भर द्यावा. असे मत यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
यंदाच्या क्रीडासंग्राममध्ये कबड्डी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब, लंगडी, आट्यापाट्या, लाठीकाठी, रस्सीखेच अशा पारंपरिक खेळांसोबतच जलतरण, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, फुटबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, तायक्वांदो, जिम्नॅस्टिक्स, रायफल शूटिंग, तिरंदाजी, रग्बी, पिकल बॉल, रिंग टेनिस, रोलर स्केटिंग, बुद्धिबळ, टेबल टेनिस, हँडबॉल, व्हॉलीबॉल, जुडो, बॉडीबिल्डिंग, कॅरम, पेटाँक आणि बॉक्स क्रिकेट, गटका अशा एकूण ३२ क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. पारंपरिक खेळांचा वारसा जपत नव्या पिढीच्या आवडीच्या आधुनिक खेळांनाही समान संधी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. लोकप्रिय खेळांसोबत तुलनेने कमी प्रसिद्धी मिळणाऱ्या खेळांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ठाणे, नवी मुंबई, दिवा, कळवा, डोंबिवली पूर्व-पश्चिम, कल्याण पूर्व-पश्चिम, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर अशा विविध भागांतील ३५ हून अधिक क्रीडास्थळांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम, बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर, सिंधुताई सपकाळ तिरंदाजी संकुल, शरदचंद्रजी पवार मिनी स्टेडियम, साकेत पोलीस मैदान, संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण आणि सेंच्युरी रेयॉन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांसह विविध मैदानांवर खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंपुरता हा महोत्सव मर्यादित न राहता जिल्ह्याच्या विविध भागांतील स्थानिक आणि नवोदित खेळाडूंनाही स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
