-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची प्रमुख उपस्थिती
- ठाणे जिल्ह्यातील ३५ हून अधिक क्रीडास्थळांवर ३२ खेळांच्या स्पर्धांचा थरार; हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती
- डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित क्रीडामहोत्सवाचा भव्य सांगता सोहळा डोंबिवलीत
- विविध खेळांतील विजेत्या खेळाडूंचा गौरव होणार
कल्याण ( शंकर जाधव ) : तब्बल ७५ हजारांहून अधिक खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, ठाणे जिल्ह्यातील ३५ हून अधिक क्रीडास्थळांवर रंगलेल्या ३२ विविध क्रीडाप्रकारांतील अटीतटीच्या स्पर्धा आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देणारे क्रीडाप्रेमी... अशा अभूतपूर्व प्रतिसादाने गाजलेल्या ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चा आज, रविवार, २९ नोव्हेंबर रोजी दिमाखदार समारोप होणार आहे. या भव्य सांगता सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात सायंकाळी ५ वाजल्या नंतर हा सोहळा पार पडणार असून, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत या क्रीडामहोत्सवाची सांगता होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडासंग्रामच्या दुसऱ्या हंगामाला यंदा पहिल्या पर्वाच्या तुलनेत अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघापुरता मर्यादित न राहता ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील खेळाडूंनाही या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील, ग्रामीण भागांतील तसेच लहान-मोठ्या परिसरांतील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. तब्बल ७५ हजार खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवित या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
या क्रीडामहोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील सुमारे ३५ हून अधिक विविध क्रीडास्थळांवर एकाच कालावधीत विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कबड्डी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब, लंगडी, आट्यापाट्या, लाठीकाठी, रस्सीखेच अशा पारंपरिक खेळांसोबतच जलतरण, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, फुटबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, तायक्वांदो, जिम्नॅस्टिक्स, रायफल शूटिंग, तिरंदाजी, रग्बी, बुद्धिबळ, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल यांसह एकूण ३२ क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला. पारंपरिक खेळांचा वारसा जपत आधुनिक खेळांनाही समान व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. विविध ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धांना हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह वाढविला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.
या स्पर्धांच्या माध्यमातून केवळ विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली नाही, तर स्थानिक पातळीवरील नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधीही मिळाली. विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपले कौशल्य, जिद्द आणि क्रीडानैपुण्य दाखवून दिले. मोठ्या शहरांतील खेळाडूंसोबतच ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरांतील खेळाडूंनाही एकाच व्यासपीठावर संधी मिळाल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले. खेळांच्या माध्यमातून तरुणाईला प्रत्यक्ष मैदानाशी जोडणे, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देणे आणि भविष्यातील गुणवंत खेळाडू शोधून त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला यंदा मोठे यश मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘सांसद खेल महोत्सव’च्या धर्तीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार क्रीडासंग्रामची संकल्पना प्रत्यक्षात आणली. पहिल्या हंगामाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसऱ्या हंगामात स्पर्धांची व्याप्ती वाढवत तीन लोकसभा मतदारसंघांतील खेळाडूंना सहभागी करून घेण्यात आले. क्रीडा स्पर्धांबरोबरच खेळाडूंना आवश्यक सुविधा, प्रोत्साहन आणि भविष्यातील संधी उपलब्ध करून देण्याच्या व्यापक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे खासदार क्रीडासंग्राम हा केवळ दहा दिवसांचा क्रीडामहोत्सव न राहता ठाणे जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
या भव्य क्रीडामहोत्सवाचा समारोप आज डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविय यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या हजारो खेळाडूंच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि क्रीडानैपुण्याचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची सांगता मोठ्या उत्साहात होणार असून, आगामी काळातही अधिक व्यापक स्वरूपात अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
खेळाडूंना मोठे व्यासपीठ, क्रीडा संस्कृतीला नवी दिशा !खासदार क्रीडासंग्रामच्या दुसऱ्या हंगामाला मिळालेला ७५ हजारांहून अधिक खेळाडूंचा प्रतिसाद हा ठाणे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील क्षमता आणि तरुणाईचा खेळांकडे वाढता कल अधोरेखित करणारा आहे. प्रत्येक शहरातील, प्रत्येक तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, या संकल्पनेतून या उपक्रमाचा विस्तार करण्यात आला. या स्पर्धांमधून पुढे येणारे खेळाडू भविष्यात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाणे जिल्ह्याचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
