Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

गौण खनिज व्यवस्थापनात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 ‘
महाखनिज २.०’च्या प्रभावी अंमलबजावणीतून अवैध उत्खननाला आळा घाला

महाखनिज २.० प्रणालीच्या प्रभावी वापरासाठी निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

नवी मुंबई, दि. २७ :- गौण खनिज व्यवस्थापनातील जुनी व कालबाह्य कार्यपद्धती बदलून गतिमान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘महाखनिज २.०’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करावी.प्रणालीवर प्रलंबित असलेली सुमारे प्रकरणे निकाली काढावीत. अवैध उत्खनन, अनधिकृत वाहतूक आणि महसूल गळती रोखण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाखनिज २.० प्रणालीच्या प्रभावी वापराबाबत निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत महसूल मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त सिद्धाराम सालीमठ, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, अपर आयुक्त वैशाली उंटवाल, सहआयुक्त रविंद्र पवार आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, महाखनिज २.० ही केवळ तांत्रिक प्रशिक्षणाची किंवा नवीन प्रणाली वापरण्याची बाब नाही, तर गौण खनिज व्यवस्थापनातील जुनी कार्यपद्धती बदलून प्रशासनात परिवर्तन घडविण्याचा हा प्रयत्न आहे. ‘ईज ऑफ लिव्हिंग’आणि ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या संकल्पनांना अनुसरून लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने ही प्रणाली पूर्णपणे आत्मसात करून आपल्या जिल्ह्यात या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करावी. राज्य शासनाने गौण खनिजातून ५ हजार कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट निश्चित केले असून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केल्यास हे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अवैध उत्खनन आणि वाहतुकीमुळे होणारी महसूल गळती रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की , राज्यात आतापर्यंत झालेल्या गौण खनिज उत्खननाचा जिल्हा व तालुकानिहाय संपूर्ण डिजिटल डेटा तयार करावा.किती अधिकृत उत्खनन झाले, किती अवैध उत्खनन झाले, किती रॉयल्टी जमा झाली आणि किती महसूल थकीत आहे, याची अद्ययावत माहिती प्रणालीवर उपलब्ध असावी. मागील १५ वर्षांतील अवैध वाहतूक, उत्खनन आणि दंडवसुलीचा तपशीलही डिजिटल स्वरूपात आणावा. यामुळे अवैध उत्खननाची व्याप्ती आणि संबंधित कालावधीतील जबाबदारी निश्चित करणे शक्य होईल.

महाखनिज २.० प्रणालीमध्ये अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड विकसित करावा. कोणत्या स्तरावर किती अर्ज प्रलंबित आहेत, कोणत्या अधिकाऱ्याकडे कार्यवाही बाकी आहे, याची माहिती सहज उपलब्ध व्हावी. अवैध उत्खनन झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात त्याची नोंद करण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गौण खनिजाचा वापर करणाऱ्या सर्व विभागांनी त्यांच्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या खनिजाची मागणी महाखनिज २.० प्रणालीवर नोंदवावी. बांधकाम प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजाची माहितीही प्रणालीवर अपलोड करावी. इमारतींच्या बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेतही आवश्यक गौण खनिजाची माहिती नोंदविण्याची व्यवस्था करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल. यामुळे प्रत्यक्ष वापर, रॉयल्टी आणि महसूल यांचे एकत्रित संनियंत्रण शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गौण खनिजाच्या रॉयल्टी भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अंतिम वापरकर्त्यानेच थेट महाखनिज २.० प्रणालीवर रॉयल्टी भरण्याची व्यवस्था करण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दंडवसुलीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, दंड आकारणीची प्रक्रिया सुलभ करणे आणि थकीत महसूल वसुलीसाठी प्रभावी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यातील अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमावर्ती जिल्ह्यांनी विशेष दक्षता घ्यावी. गुजरात, छत्तीसगड आणि तेलंगणा या सीमावर्ती राज्यांतून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रणासाठी संबंधित विभागांची समन्वय बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एम-सँड क्रशर उभारण्यावर भर द्यावा. कृत्रिम वाळूच्या विविध पर्यायांचा अभ्यास करून पुढील तीन वर्षांत एम-सँडचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देशही महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी दिले.

महाखनिज २.० प्रणाली विकसित करण्यासाठी अपर मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करताना मंत्री श्री.बावनकुळे यांनी या प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे स्वागत असल्याचे सांगितले. क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी शासनाला कळवाव्यात. प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि धोरणात्मक सुधारणा करण्यास शासन तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले की, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागात केवळ प्रशासकीय सुधारणा नव्हे, तर दूरगामी परिणाम घडविणारे परिवर्तनकारी बदल होत आहेत. महाखनिज २.० हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. नदीतील वाळू उत्खननावर टप्प्याटप्प्याने निर्बंध आणण्याच्या संभाव्य निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एम-सँड योजना राबविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मंत्रालयीन स्तरावर सुधारणा सुरू झाल्या असल्या, तरी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. विभागाचे धोरण आणि दृष्टी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी रात्रंदिवस काम करण्यास तयार असून, जिल्हानिहाय आढावा घेऊन अंमलबजावणीला गती देण्यात येईल.

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘महाखनिज २.०’ प्रणालीची कार्यप्रणाली, उपलब्ध सुविधा आणि अंमलबजावणीचा आढावा सादर केला. या प्रणालीत पूर्वीची ऑनलाईन व ऑफलाईन व्यवस्था बदलून पूर्णत: ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, वाहन व्यवस्थापन प्रणालीद्वारे जीपीएस ट्रॅकिंग, ई-पंचनामा, विविध विभागांशी एकात्मिक जोडणी तसेच अर्जांच्या मंजुरीची स्तरनिहाय स्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे पोर्टलचा वापर करून प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रणालीतील विविध ॲप्स, ड्रोन, दंडवसुली, रॉयल्टी आणि वाहन नोंदणीच्या सुविधांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत गेल्या तीन महिन्यांत १० लाखांहून अधिक डिजिटल वाहतूक परवाने (डीजीटीपी) तयार झाले असून, सुमारे ५० लाख ब्रास उत्खननासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महसूल मंत्र्यांची ‘महाखनिज’वॉर रूमला भेट; कार्यप्रणालीची घेतली माहिती

दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील ‘महाखनिज’वॉर रूमला भेट देऊन तेथील कामकाजाची आणि कार्यप्रणालीची सविस्तर माहिती घेतली. गौण खनिजांचे उत्खनन व वाहतूक यांवर ठेवण्यात येणारे नियंत्रण, अवैध उत्खनन रोखण्यासाठी केली जाणारी कार्यवाही आणि महसूल वसुलीच्या प्रक्रियेबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आणि सह आयुक्त रवींद्र पवार यांनी वॉर रूमच्या कामकाजाचे स्वरूप, उपलब्ध तांत्रिक सुविधा आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाबाबत महसूल मंत्र्यांना माहिती दिली.

या कार्यशाळेस राज्यातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |