Type Here to Get Search Results !

विकसित देशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दहावर्ष पारखलेल्या सरकारलाच जनतेनं पुन्हा संधी दिली - पंतप्रधान


विकसित देशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच, दहा वर्ष पारखुन घेतलेल्या सरकारला जनतेनं पुन्हा एकदा सत्ता दिली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या सगळया आरोपांना लोकसभेत आक्रमक उत्तर दिलं. देशातल्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेनं अत्यंत परिपक्व जनादेश दिला आहे. मात्र, आपल्याला विजय मिळाला आहे, असा भ्रम, काँग्रेस आणि विरोधक जाणुन बुजून पसरवत आहे. खरं तर जनतेनं काँग्रेसलाही जनादेश दिला आहे, आणि तो म्हणजे विरोधात बसण्याचा. सलग तिसऱ्यांदा काँग्रेस देशात शंभर जागांचा आकडाही गाठू शकलेली नाही. १९८४ मध्ये बहुमत मिळाल्यानंतर इतक्या वर्षात दहा लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला २५० ही जागा गाठता आलेल्या नाहीत. या निवडणुकीत तेरा राज्यात, शून्य जागा मिळवणारी काँग्रेस आता परजीवी काँग्रेस झालेली आहे. हा जनादेश काँग्रेसनं प्रामाणिकपणे स्वीकारावा, असा आक्रमक हल्लाबोल पंतप्रधानांनी केला.

राहुल गांधी यांनी काल उपस्थित केलेल्या सर्व आरोपांना पंतप्रधानांनी उत्तर दिलं, शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक हमीभाव मिळतो आहे. नीट प्रकरणात आरोपींचं अटक सत्र सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हिंदु समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न या सभागृहाला करण्यात आला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट होती, असं सांगत हिंदूना दहशतवादी आणि हिंसक ठरवणं काँग्रेसची जुनी सवय आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

जेव्हा काँग्रेसला सत्ता मिळत नाही, तेव्हा ते देशभरात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात. भाषा, उत्तर-दक्षिण अशा मुद्दयांवरुन देशातल्या राज्यात भांडणं लावतात. जाती-जातीमध्ये भांडण लावतात आणि खोटं बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करतात. काल सभागृहात आपण अशाच खोटयाचं नाटय पाहिलं, असं सांगत पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. यांनी सीएए, ईव्हीएम, संविधान अशा सगळया मुद्दयांवर खोट पसरवलं आणि खोटं पसरवून निवडणुक जिंकता येतात हे लक्षात आल्यावर काँग्रेसला खोटं बोलण्याची चटक लागली आहे, असं मोदी म्हणाले आणि जेव्हा देशावर, साठ वर्षे राज्य करणारा पक्ष जनतेला भ्रमित करणारी वक्तव्यं मुद्दाम करतो, तेव्हा त्यांना देश अराजकतेकडे न्यायचा आहे, याचंच हे निदर्शक असतं.

या देशानं दीर्घकाळ तुष्टीकरणाचं राजकारण पाहिलं, मात्र आम्ही संतुष्टीकरणाचं राजकारण करत आहोत, याचा अर्थ प्रत्येक योजना शंभर टक्के योजना सर्वांपर्यंत पोहचवणं, हाच सामाजिक न्याय आहे आणि हीच खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता आहे. आमची नीती , आमची नियत आणि आमची निष्ठा पाहूनच जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी, आम्ही सिध्द आहोत. कोटयवधी लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, विकसित देशाचा पाया या निवडणुकांनी रचला आहे आणि या पायावर विकसित देशाची इमारत आम्ही उभी करणार आहोत, असं पंतप्रधान म्हणाले.

गेल्या दहा वर्षात आमच्या अनेक उपलब्धी आहेत, मात्र, आमचं सर्वात मोठं यश म्हणजे देशाचं काहीही होऊ शकत नाही, या निराशेच्या गर्तेतून आम्ही देशाला बाहेर काढलं आणि आपण काहीही करु शकतो हा विश्वास देशाच्या मनात रुजवला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातलं एक विधान उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले. देशाच्या विरोधात काम करणाऱ्या इको सिस्टीमला आमचं आव्हान आहे,की तुमचे इरादे कधीही पूर्ण होणार नाही आणि त्यांच्या प्रत्येक कारस्थानाचं उत्तर त्यांना आता त्यांच्याच भाषेत दिलं जाईल, असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी दिला.

तिसऱ्या कार्यकाळात, आमचं सरकार तिप्पट ऊर्जा आणि वेगानं काम करेल, देशवासियांना या विकासाची प्रचीती येईल, असंही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांच्या जवळपास दोन तास सुरु असलेल्या भाषणाच्यावेळी संपूर्ण काळ विरोधकांनी अभूतपूर्व गदारोळ आणि घोषणाबाजी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies