डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली जवळील उंबार्ली गावातील तलावात चारचाकी वाहन बुडता बुडता वाचले.अंदाज चुकल्याने हे वाहन तलावात गेले असले तरी वाहनातील पती पत्नी वेळेवर बाहेर पडल्याने बचावले अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्यचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कानबाने यांनी दिली. ही घटना बुधवार 22 तारखेला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस व शिवसैनिक मदतीला धावले.
पती - पत्नी येथील देवळात दर्शन घेऊन परत घरी जाण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनात बसले. गाडी चालू करताना अंदाज चुकल्याने गाडी थेट तलावात गेली.वेळीच पती - पत्नी चारचाकी वाहनातुन बाहेर पडले. त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना व पोलिसांना दिली.याची माहिती शिवसैनिकांना मिळताच शिवसैनिक मदतीला धावले.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दलाला उंबार्ली तलावाजवळ बोलावले.स्थानिक नागरिक, शिवसैनिक, पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तलावातील चारचाकी वाहन बाहेर काढण्यात आले.
याबाबत स्थानिक नागरिक लालचंद पाटील म्हणाले, या घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांना याबाबत सर्व माहिती घ्यावी असे सांगितले.