केडीएमसीकडून मंजूर जलवाहिनीच्या कामाचे नरेंद्र पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आंबिवली परिसरात असलेल्या नेपच्यून गृहसंकुलातील पाण्याची समस्या आता कायमस्वरूपी मार्गी लागली आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे केलेल्या अविरत पाठपुराव्याला यश आले असून या जलवाहिनीच्या कामाचे नरेंद्र पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कल्याणच्या आंबिवलीजवळील नेपच्यून स्वराज्य नगरी येथील शेकडो रहिवासी गेल्या वर्ष दिड वर्षांपासून पाण्याच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या गृहसंकालातील अनेक जणांनी इथले घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला तर काही जण आपले स्वतःचे राहते घर भाड्याने देऊन दुसरीकडे भाड्याच्या घरामध्ये राहायला गेले होते. या परिस्थितीवरूनच इथल्या पाणी समस्येचा अंदाज येऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर या गृहसंकुलातील महिला भगिनींनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कानावर ही समस्या घालत ती सोडवण्यासाठी मागणी केली होती. तसेच स्थानिक रहिवासी अनंता पाटील आणि दशरथ पाटील यांनीही हे काम होण्यासाठी नरेंद्र पवार यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही मग लगेचच कल्याण डोंबिवली महापालिकेकडे पत्रव्यवहार करून ही पाणी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. गेले वर्ष दिड वर्षे नरेंद्र पवार यांच्याकडून पालिका प्रशासनाकडे अखंड आणि अविरत असा पाठपुरावा केला जात होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने या गृहसंकुलासाठी स्वतंत्र नविन जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून नेपच्यून स्वराज नगरी मेन गेट ते स्वराज्य नगरी सेक्टर 2 पर्यंत ही नवी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
परिणामी नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेचे औचित्य साधून या जल वाहिनीच्या कामाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यामुळे लवकरच हे काम पूर्णत्वास जाणार असून पुरेशा पाण्याअभावी इथल्या रहिवाशांनी भोगलेल्या यातनांमधून आता कायमस्वरूपी सुटका होणार आहे.
हे अतिशय महत्त्वाचे काम मार्गी लावल्याबद्दल नेपच्यून गृहसंकुलातील स्वराज्य नगरी सेक्टर 2 च्या महिला भगिनी आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या वतीने माजी आमदार नरेंद्र पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
या कामाचे श्रेय केवळ आपल्या एकट्याचे नसून यामध्ये गृहसंकुलातील महिला भगिनींचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्याकडून सतत आपल्याला या कामासाठी आग्रह आणि विनंती केली जात होती. मात्र या कामाच्या श्रेयापैक्षा आजच्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर माझ्या भगिनी आणि तुम्हा सर्व रहिवाशांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद - समाधान हीच आपल्यासाठी मोठी पोचपावती असल्याची भावना यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली. तसेच आपण यापुढेही तुम्हा सर्वांसाठी कायम असेच उभे राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी भाजपा मांडा टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, बुधाराम सरनोबत, भाजपा मोहने मंडल सरचिटणीस अनंता पाटील, दशरथ पाटील, परेश गुजरे, संदीप पाटील, शशिकांत पाटील, अक्षय पाटील, भरत कडाळी, दिपक कांबळे, हेमंत गायकवाड, संदीप गायकवाड, अमोल केदार, शैलेश देशपांडे, रामजीत तिवारी, पंकज सिंह, पुनित सिंह, अर्चना पाटील, कावेरी पाटील, प्रतिक्षा बारलो, सेक्टर २ फेडरेशन अध्यक्ष सोमनाथ चकोर, भानुदास थोपटे, बाळा कविटकर, महिला भगिनी शिल्पा थोपटे, सारिका बोराडे, आशा खरात, शितल चकोर, आदी मान्यवर आणि सोसायटीमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
