जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत
'शहीद कॅप्टन विनायक गोरे' एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग संपन्न..!
मुंबई,दि.24: विद्याविहार येथील के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने आपला 66 वा वर्धापन दिन उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या भावनेत साजरा होत असताना, महाविद्यालयाच्या सभागृहात गेल्या तीन दशकांपासून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत पेटवणारा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ या वीर सैनिकावर आधारित एकपात्री लघुनाटिकेचा 5 हजारावा प्रयोग सादर करून उपस्थितांचे मन भारावून टाकले.
या छोट्या पण प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडणाऱ्या नाट्यप्रयोगात प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक दृश्यात देशभक्तीची गंध होती. महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या आनंदात, देशभक्तीची ही अमुल्य शिकवण विद्यार्थ्यांना प्रेरणेचा प्रवाह बनून वाहत होती. शौर्य आणि त्यागाच्या या संगमात, महाविद्यालयाने आपला संस्कार, इतिहासप्रेम आणि सामाजिक जबाबदारी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पुन्हा एकदा सिद्ध केले.
यावेळी प्राचार्य डॉ.किशन पवार यांच्या हस्ते डॉ.पवन अग्रवाल, माजी विद्यार्थी संघटनेच्या संचालिका, वीरमाता अनुराधा गोरे, माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप यांच्यासह महाविद्यालयातील ज्या माजी विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा हिंदी साहित्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते व माजी प्राध्यापक डॉ.सतीश पांडे, लेफ्टनंट कर्नल सतीश कुमार सिंग, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती वर्षा भोसले, गुलामहुसेन एम. सय्यद या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आतिश तौकरी, डॉ.हेमाली संघवी, डॉ.संगिता भट, डॉ.महेंद्र मिश्रा, एनएसएस समिती सदस्य डॉ.अनंत द्विवेदी, माजी विद्यार्थी संघटनेच्या संबंध संचालक - एसव्हीव्ही, एसव्हीयू आणि एसएव्ही श्रीमती दुर्गा सिन्हा, सनदी लेखापाल व माजी विद्यार्थी संघटनेचे मुख्य समन्वयक निलेशकुमार अग्रवाल, बी.एल. रुईया शाळेचे उप मुख्याध्यापक दिनेश गायकवाड, डॉ.राजेश कटेशिया, ॲडव्हेंचर क्लबचे संचालक बबन पवार, मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य व समाजमाध्यम तज्ञ त्रियोगीनारायण पांडे, ब्युरो चीफ हरिकेश जयस्वाल, एनसीसी, एनएसएस, मराठी प्रबोधन, कल्चरल फोरमचे विद्यार्थी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व महाविद्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक प्रयोगात देशभक्ती - 5 हजाराव्यांदा उजळला इतिहास
26 सप्टेंबर 1995 रोजी जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर केवळ 27 वर्ष वयाच्या कॅप्टन विनायक गोरे यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर 1995 रोजी एनसीसी कॅडेट असलेले मनोज सानप यांनी के.जे. सोमय्या महाविद्यालयात ही एकपात्री लघुनाटिका प्रथम सादर केली. 5 हजाराव्या प्रयोगादरम्यानही ती विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणेचा स्त्रोत ठरली आहे.
नाटिकेत प्रत्येक संवाद, प्रत्येक शब्द प्रेक्षकांच्या हृदयावर थेट परिणाम करतो. या प्रेरणेतून अनेक युवक सैन्यात दाखल झाले, तर काहींनी रक्तदान, अवयवदान, सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान, ध्वजदिन निधी संकलन आणि इतर समाजोपयोगी कार्य करून देशसेवा सुरू केली.
मनोज सानप यांनी कधीही वैयक्तिक लाभ न घेता फक्त राष्ट्रभक्तीची मशाल जिवंत ठेवली. फाउंडेशन डेच्या विशेष सोहळ्यात हा 5 हजारावा प्रयोग सादर होणे, महाविद्यालयाच्या संस्कारांना जिवंत ठेवण्याचे अप्रतिम उदाहरण ठरले. उपस्थितांचे डोळे अभिमान आणि कृतज्ञतेच्या अश्रूंनी भरले; सर्वांच्या मनात एकच भावना होती. आपल्या शहीद वीरांना सलाम आणि त्यांचा इतिहास जिवंत ठेवणाऱ्या या कलाकारालाही सलाम!
के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा वर्धापन दिन आणि मनोज सानप यांच्या देशभक्तीपर नाट्यप्रयोगाने शौर्य, त्याग आणि देशभक्तीची ज्वाला विद्यार्थ्यांमध्ये तेजस्वी केली, हे यंदाच्या वर्धापनदिनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले.
यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रसिद्ध वक्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक डॉ.पवन अग्रवाल यांनी आपल्या कॉलेजच्या दिवसांपासून ते आजपर्यंतच्या यशस्वी प्रवासाविषयी आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
याप्रसंगी 'शहीद कॅप्टन विनायक गोरे' यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे म्हणाल्या की, एक कर्तृत्ववान शासकीय अधिकारी असलेल्या मनोज सानप यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. तो त्याच्या महाविद्यालयीन जीवनापासून मागील तीस वर्षे अखंडपणे आपली शासकीय सेवा जबाबदारीने उत्कृष्टरित्या सांभाळून 'शहीद कॅप्टन विनायक गोरे' या एकपात्री नाटिकेचे प्रयोग करतो आहे. अनेकांना यातून प्रेरणा मिळाली आहे, मिळत आहे. त्याच्या या प्रयोगातून अनेकांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्याचबरोबर रक्तदान, अवयवदान, सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान, ध्वजदिन निधी संकलन यासह अन्य समाजोपयोगी कार्यासाठी देखील या प्रयोगाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत आहे. या के.जे. सोमय्या महाविद्यालयाची ओळख ही भारतीय संस्कृती, संस्कार जपणारे महाविद्यालय अशी आहे.
श्री.मनोज सानप यांच्या मातोश्री माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री.सानप यांच्या बालपणापासूनच्या प्रवासाविषयी अनुभवकथन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना योग्य वयात, योग्य गोष्टींचा ध्यास घेतल्याने आणि प्रत्यक्ष कृती केल्याने जीवनात यशस्वी होणे अवघड नाही असा मोलाचा सल्ला दिला.
प्राचार्य डॉ.किशन पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या जडणघडणीत श्री.सानप यांनी आपले योगदान द्यावे. तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्याविषयी आवाहन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सत्यवान हणेगावे यांनी महाविद्यालयाचा प्रगती अहवाल सादर केला, तर माजी विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस शिजो पॉल यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक सिमरन महतानी यांनी केले. शेवटी डॉ.मीरा वेंकटेश यांनी आभार प्रदर्शन केले व त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
