ठाणे — ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) यांनी दि. १० नोव्हेंबर, २०२५ रोजी ठाणे (पूर्व) येथील कमलिनी कर्णबधिर विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धती, श्रवण-वाचा विकासासाठी करण्यात येणारे उपक्रम, तसेच Cochlear Implant Surgery या तंत्रज्ञानाची गरज आणि उपयुक्तता जाणून घेतली.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी प्रत्येक वर्गाला भेट देत विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधला. शिक्षणासोबत त्यांच्या आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीवांबाबत माहिती घेतली.
जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले की, “तुम्ही परिस्थितीवर मात करून ज्ञान आणि श्रमाच्या बळावर भविष्य घडवू शकता. तुमच्यात असलेली जिद्दच तुमची खरी ताकद आहे. शिक्षण, श्रवण आणि वाचा विकासाच्या माध्यमातून तुमचा प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. प्रत्येक शिक्षक, पालक आणि समाजातील घटक जर या विद्यार्थ्यांच्या मागे ठाम उभे राहिले, तर हे बालक नक्कीच यशस्वी जीवनाचा मार्ग तयार करतील.”
या भेटीदरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल कल्याण विभाग) संजय बागुल, बालविकास प्रकल्प अधिकारी, नवी मुंबई ज्योती पाटील, गणेश जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या अध्यापक वर्गाशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाच्या स्तरावरून आवश्यक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माया कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारींचे स्वागत केले आणि विद्यालयातील शैक्षणिक व प्रशिक्षण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी वाचा आणि श्रवण विकासासह संवाद कौशल्य वाढविण्यासाठी शाळेत विशेष प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ‘Cochlear Implant Surgery’ द्वारे विद्यार्थ्यांना श्रवणशक्ती पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
“आमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आमच्यासाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. जिल्हाधिकारी सरांनी दिलेलं मार्गदर्शन आमच्या जीवनात आत्मविश्वास वाढवणारं आहे.” - विद्यार्थिनी रिया कनोजिया, इयत्ता सातवी
