नवी दिल्ली दि. 11- महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच उपलब्ध असलेल्या संधीबाबत महाराष्ट्र राज्याचे दिल्ली येथील निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांनी आज पीएचडी चैंबर ऑफ़ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(फिक्की) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
पीएचडी चैंबर ऑफ़ कॉमर्स एंड इंडस्ट्री च्या मुख्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरचिटणीस डॉ रणजित मेहता यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वेगाने बदलणाऱ्या महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी तसेच त्याला अधिक चालना देण्यासाठी करावयाच्या योजना आणि अन्य अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. श्री गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाचे उद्योगधोरण, देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील निवासी गुंतवणूक आयुक्त यांच्या दालनात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (फिक्की)राज्य गुंतवणूक विभाग संचालक तरुण जैन आणि शिवम मोहले यांच्यासोबत महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी श्री गायकवाड यांनी महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, गुंतवणूक संधी आणि राज्याच्या जागतिक स्तरावरील प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली.
पीएचडी चैंबर ऑफ़ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फिक्कीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज झालेल्या चर्चे दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या गुंतवणूकीला चालना देण्यासाठी सकारात्मकता दर्शविली.
