नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण निश्चिती व सोडत आज दि.11 नोव्हेंबर 2025 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहामध्ये महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या नियंत्रणाखाली सुव्यवस्थित रितीने पार पडली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, निवडणूक विभागाचे उपायुक्त श्री. भागवत डोईफोडे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, मुख्य लेखा परीक्षक श्री.राजेंद्र गाडेकर, उपायुक्त श्री.संजय शिंदे, श्रीम.संघरत्ना खिल्लारे, श्रीम.ललिता बाबर, कार्यकारी अभियंता श्री.प्रविण गाडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित केली आहे. त्यानुसार 111 सदस्यसंख्येकरिता 28 प्रभाग असून त्यामधील 27 प्रभाग हे चार सदस्यीय व 1 प्रभाग तीन सदस्यीय झालेला आहे.
4 सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक असून त्यामध्ये आरक्षण निश्चित करताना नियम देण्यात आले आहेत. हे नियम उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत ही आरक्षण सोडत प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
राज्य निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या प्रभागातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चित केले असून त्यानुसार 10 प्रभागातील जागा हया अनुसूचित जाती व 2 प्रभागातील जागा या अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण 111 जागांच्या 27% प्रमाणात 29 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेच्या एकूण 111 सदस्यांपैकी एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा कमी नाही म्हणजेच 56 महिला सदस्य असतील व प्रत्येक प्रभागात किमान 2 महिला सदस्य असणे आवश्यक आहे हे लक्षात घेत महिलांसाठीचे आरक्षण काढण्यात आले.
सन 2011 च्या जनगणनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या 11 लाख 36 हजार 170 असून अनुसूचित जातींची लोकसंख्या 1 लाख 839 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 19 हजार 646 निर्देशित करण्यात आली आहे.
त्यास अनुसरुन प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने 10 प्रभागातील जागांचे आरक्षण अनुसूचित जातीकरिता राखीव ठेवण्यात आले व त्यामधील 50% म्हणजे 5 प्रभाग अनुसूचित जाती महिला याकरिता सोडतीव्दारे काढण्यात आले. सदर सोडत प्रक्रिया उपस्थितांना प्रभाग क्रमांकाच्या चिठ्ठया दाखवून, त्या चिठ्ठयांचा पाईपच्या सहाय्याने समान आकाराचा गोल करून व त्यावर मध्यभागी सारख्या रंगाचे रबरबँड लावून त्या गोलाकार चिठ्ठया पारदर्शक रोलरमध्ये ठेवण्यात आल्या. तो रोलर 5-5 वेळा उलट-सुलट फिरवून शालेय विदयार्थ्यांच्या डोळयावर काळे कापड बांधून त्यामधील 5 चिठ्ठयांची अनुसूचित जाती महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली.
अनुसूचित जाती प्रभाग क्र. :- 3 (अ), 6(अ), 7(अ), 8(अ), 22(अ)
अनुसूचित जाती (महिला) प्रभाग क्र. :- 1 (अ), 2(अ), 4(अ), 20(अ), 28(अ)
अशाच प्रकारे अनुसूचित जमाती करिता लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने 2 प्रभागातील जागांचे आरक्षण अनुसूचित जमातीकरिता राखीव ठेवण्यात आले व त्यामधील 50% म्हणजे 1 प्रभाग अनुसूचित जाती महिला याकरिता सोडतीव्दारे काढण्यात आला. सदर सोडत प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पाडण्यात आली.
अनुसूचित जमाती प्रभाग क्र. :- 8(ब)
अनुसूचित जमाती (महिला) प्रभाग क्र. :- 6(ब)
यानंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग याकरिता 29 प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले तसेच त्यामधून 50% म्हणजेच 15 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आरक्षणाकरिता सोडत काढण्यात आली.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग प्रभाग क्र. :- 2(ब), 4(ब), 5(ब), 6(क), 9(अ), 10(अ), 12(अ), 13(अ), 15(अ), 17(अ),19(अ), 24(अ), 25(अ), 26(अ),
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) प्रभाग क्र. :- 1(ब), 3(ब), 5(अ), 7(ब), 8(क), 11(अ),14(अ), 16(अ), 18(अ), 20(ब), 21(अ), 22(ब), 23(अ), 27(अ), 28(ब)
त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागात किमान 2 महिला सदस्य असणे अनिवार्य आहे हे लक्षात घेत सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार -
सर्वसाधारण प्रभाग क्र. :- 1(क), 1(ड), 2(ड), 3(ड), 4(ड), 5(ड), 7(ड), 9(ड), 10(ड), 11(क), 11(ड), 12(ड), 13(ड), 14(क), 14(ड),15(ड), 16(क), 16(ड), 17(ड), 18(क), 18(ड), 19(ड), 20(क), 20(ड), 21(क), 21( ड), 22(ड), 23(क), 23(ड), 24 (ड), 25(ड), 26(ड), 27(क), 27(ड), 28(क).
सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्र. :- 2(क), 3(क), 4(क), 5(क), 6(ड), 7(क), 8(ड), 9(ब), 9(क), 10(ब), 10(क), 11(ब), 12(ब), 12(क), 13(ब), 13(क), 14(ब), 15(ब), 15(क), 16(ब), 17(ब), 17(क),18(ब), 19(ब), 19(क), 21(ब), 22(क), 23(ब), 24(ब), 24(क), 25(ब), 25(क), 26(ब), 26(क), 27(ब).
अशाप्रकारे संपूर्ण आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या नियंत्रणाखाली सुव्यस्थित रितीने संपन्न झाला. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार हरकती व सूचना मागविण्यासाठी विहीत नमुन्यात आरक्षणाचे प्रारूप 17 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून तेव्हापासून 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत हरकती व सूचना सादर करावयाचा कालावधी आहे. हरकती व सूचना नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील निवडणूक विभाग किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय या ठिकाणी सादर करता येतील असे जाहीर करण्यात आले.
