रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह मीरा रोड पूर्व येथे भव्यदिव्य स्वरूपात संपन्न होणार पुरस्कार वितरण कार्यक्रम
मुंबई (शांताराम गुडेकर) : बालपणापासून गायन व संगीताची आवड असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या निवे खुर्द येथील शाहीर जयंत राजाराम चव्हाण( उर्फ बापू) यांनी वयाच्या १७ व्या वर्षी गुरुवर्य शिवशाहीर विठोबा साळवी रा. खेड यांच्या मार्गदर्शनाखाली , कोकणातील प्रसिद्ध लोककला जाखडी, नमन या क्षेत्रात पहीले पाऊल ठेवले आणि यशस्वीपणे गेली ४०वर्ष ही कला जोपासत आहेत.कलगीतुरा समन्वय समिती संगमेश्वर देवरुखचे गेली २५ वर्ष ते उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.सामाजिक,क्षेत्रात ही बापू अग्रेसर आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत कलगी तुरा लोककला संवर्धनपर अविरत कार्यरत असणारी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई-(महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने कलगी तुरा शाहीर पुरस्कार-२०२५ साठी निवड झाल्याचे पत्र श्री.संतोष धारशे (सरचिटणीस) कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई यांनी दिले आहे.
कोकणातील कलगी तुरा लोककला आणि शाहिरी परंपरेला प्रोत्साहन देणारी गेली ६५ वर्ष कलगी तुरा लोककला संवर्धनपर अविरत कार्यरत असणारी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई-(महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने मुंबई नगरीत प्रथमच गौरी गणेश नृत्य स्पर्धा-२०२५ आणि दिनदर्शिका -२०२६ प्रकाशन तसेच शाहीर गुणगौरव सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह,दहिसर चेक नाका जवळ, महाजन वाडी, मीरा रोड पूर्व येथे भव्यदिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच मा.माजी आमदार सुभाषजी बने साहेब यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली.त्यानुसार रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री महोदय यांनी मंजूरी देत राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समिती(जिल्हा रत्नागिरी)मध्ये शाहीर जयंत राजाराम चव्हाण( उर्फ बापू) यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.संगमेश्वर तालुक्यातील सर्व कलेतील कलावंतांना याचा निश्चित पणे फायदा होणार आहे.त्यांची नियुक्ती तसेच कलगी तुरा शाहीर पुरस्कार-२०२५ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातून शाहीर बापू चव्हाण यांच्या वर कलावंताकडून तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन सह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
