ठाणे, : जय हनुमान मित्र मंडळ, मुंबई तळे-जांभुळवाडी यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, स्नेहसंमेलन आणि हळदीकुंकू कार्यक्रम डी. एस. सभागृह, सायन (पूर्व) येथे उत्साहात पार पडला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गणपत लोलम, सल्लागार प्रशांत शिर्के, निवृत्त तहसीलदार परशुराम जाधव, कुणबी युवा अध्यक्ष युवराज संतोष सर, रेश्मा लोलम, लक्ष्मण लोलम, रामचंद्र लोलम, पांडुरंग लोलम, राजेश लोलम, कृष्णा खापरे, मोहन मांडवकर आणि सचिव प्रमोद लोलम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. संतोष सर म्हणाले की, समाजात सकारात्मक बदल घडत आहे. “समाज विकसित विचारधारेला स्वीकारत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुण पिढीची जिद्द हीच समाजविकासाची खरी दिशा आहे.” विद्यार्थ्यांनी गौरव सोहळ्यातून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले.
मंडळाच्या ६३ वर्षांच्या कार्याचा आढावा कु. निवृत्ती दोडेकर यांनी प्रस्ताविकेतून सविस्तर मांडला. सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरणही करण्यात आले. कु. आसावरी दोडेकर यांनी सावित्रीमाई फुले यांच्यावर प्रभावी भाषण केले. प्रथमेश दोडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील दमदार पोवाडा सादर केला. सानवी लोलम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर इंग्रजी भाषण केले, तर प्रांजल लोलम यांनी शिवछत्रपतींवर इंग्रजी भाषण सादर केले.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हे देवून गौरविण्यात आले. तसेच फ्री लकी ड्रॉमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तके व आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी समाज प्रबोधनासाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करणे गरजेचे आहे, असे मत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप दोडेकर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शन समीर लोलम यांनी केला.
