ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप
ठाणे,दि.20 - रस्ते अपघातांत मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात चित्रमेध व्हिजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित असलेले श्री. राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर, लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी, आयटी तज्ञ पवन द्विवेदी, लेफ्टनंट कर्नल मोहित गौर (निवृत्त), जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, चित्रमेध व्हिजनचे आयोजक बबन लाटे व विशाल लाटे यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणे पोलीस स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
या उपक्रमाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले, “ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम प्रथमच राबविला जात आहे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.सर्वसाधारणपणे 18 वर्षांनंतर वाहन चालविण्यास पात्र झाल्यावर तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो. परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली ‘लहानपणापासून हेल्मेटची सवय’ ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षिततेची जाण निर्माण करणारी आहे. आज मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली, तर भविष्यात ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील.”
रस्ते अपघातातील मृत्यूचे वाढते प्रमाण गंभीर असून हेल्मेटचाच वापर हे त्यावरील सर्वात सोपे व प्रभावी उपाय आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच राघवेंद्र कुमार यांच्या २ लाख हेल्मेट वितरण मोहिमेची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमात हेल्मेट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न घालण्याचे धोके आणि वापराचे महत्त्व समजावून सांगावे, तसेच विनाहेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना केले.
राघवेंद्र कुमार यांनी या उपक्रमाचा उगम कसा झाला, तसेच हेल्मेट वापराचा प्रसार करण्यामागील अनुभव सांगितला. ते म्हणाले, “लहानपणापासून मुलांना हेल्मेटची सवय लावली, तर ते मोठे झाल्यावर कोणतेही वाहन कधीच विनाहेल्मेट चालवणार नाहीत. त्यामुळे भविष्यातील अपघाती मृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होईल.”
या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी वीर शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या जीवनावरील प्रसंगावर देशप्रेमावर आधारित एकपात्री एकांकिका सादर केली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना देशभक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांना प्रतिकात्मकरित्या हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक पटकविलेल्या शौर्या अंबुरे या विद्यार्थीनीचा जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
