अखंड वाचनयज्ञ उपक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न
कल्याण ( शंकर जाधव ) : "शालेय व महाविद्यालयीन जीवनात वाचलेली पुस्तके आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगी पडतात. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात निर्णय घेताना पुस्तकातील संचित ज्ञान आपल्याला सुयोग्य निर्णय घेताना मदतकारी ठरते. त्यामुळे तुम्ही मुलांनी भरपूर वाचन केले पाहिजे." असे प्रतिपादन माजी एसीपी आणि लेखक मंदार धर्माधिकारी यांनी केले.अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या सलग ३६ तास व एकत्रित ३०० अखंड वाचन यज्ञ उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी पुस्तक आदान प्रदान चळवळीचे संकल्पनाकार पुंडलिक पै यांनी मुलांनी कोणती पुस्तके वाचावी या विषयी मार्गदर्शन केले तर कल्याण पश्चिमचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी वाचनातून आपण कसे घडलो आणि आजही आपले वाचन कसे सुरू असते हे विविध प्रसंगातून उलगडून दाखविले. ॲड विवेक बिवलकर यांनी वाचनाचे बदलते स्वरूप याविषयी माहिती दिली. अखंड वाचनयज्ञ उपक्रमाचे संकल्पनाकार योगेश जोशी या उपक्रमाची प्रेरणा कशी मिळाली आणि हा उपक्रम कसा साकारत गेला हे आपल्या प्रास्ताविकातून मांडले.
५ डिसेंबर ला सकाळी ८ वाजता सुरू झालेला हा उपक्रम ६ डिसेंबर सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उद्घाटन समारंभानंतर बालक मंदिर संस्था येथील वि. आ. बुवा वाचन नगरी, भारताचार्य चिंतामणराव वैद्य सभागृह, डॉ जयंत नारळीकर वाचन कट्टा, योगानंद क्लासेस येथील बाळ कोल्हटकर वाचन कट्टा येथे तसेच एकूण २५ शाळांमधून विविध विषयांवरचे वाचन सुरू झाले. गतवर्षी या उपक्रमात १६७८ वाचक सहभागी झाले होते तर यावर्षी २५०० हून अधिक वाचक सहभागी होणार असल्याचे सचिव हेमंत नेहते यांनी सांगितले. या उपक्रमात चित्रकार प्रदीप जोशी यांनी रेखाटलेल्या साहित्यिकांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरत आहेत.
याप्रसंगी प्रकल्प प्रमुख डॉ सुश्रुत वैद्य, सुकन्या जोशी, प्रा प्रकाश माळी, नागराजन अय्यर,अमोल धर्माधिकारी, कैलास सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी बालक मंदिर संस्था, कोकणमेवा योजक, रेगे दीक्षित क्लासेस, जोशी फायनान्शिअल सर्विसेस, पै फ्रेंड्स लायब्ररी, दैनिक जनमत , साप्ताहिक कल्याण नागरिक , दैनिक ठाणेवैभव, सुस्वर क्रिएशन्स, माऊली एक शैक्षणिक ध्यास, साहित्यसंपदा, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांचे सहकार्य लाभणार आहे.
