Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

केडीएमसीची सुरक्षित-शाश्वत शहर संकल्पना डोंबिवलीतील बालाजी गार्डन गृहसंकुलाचा अंमलबजावणीसाठी पुढाकार

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून चर्चासत्र संपन्न


डोंबिवली ( शंकर जाधव)  भविष्यातील नागरी सुविधांची गरज ओळखून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने 7 प्रमुख मुद्द्यांवर सुरू केलेल्या 'सुरक्षित आणि शाश्वत शहर' संकल्पनेला कल्याण डोंबिवलीतील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यातच आता डोंबिवलीतील मोठ्या गृहसंकुलांपैकी एक असलेल्या बालाजी गार्डन गृहसंकुलाने ही सुरक्षित आणि शाश्वत शहर संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनातर्फे काल डोंबिवली पूर्वेच्या आयरे गावात संपन्न झालेल्या चर्चासत्रामध्ये बालाजी गार्डन गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी याची ग्वाही दिली.

महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता(विद्युत) प्रशांत भागवत यांच्या समन्वयातून डोंबिवलीतील बालाजी गार्डन गृहसंकुलामध्ये या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित रहिवाशांना मार्गदर्शन केले. तसेच बालाजी गार्डन गृहसंकुलाने या 7 मुद्द्यांवर काम सुरू करण्याचे आवाहनही केले.

दिवसागणिक वाढत असलेल्या नागरीकरणामुळे नागरी सुविधा आणि सेवांवर प्रचंड ताण येत आहे. आताची ही परिस्थिती पाहता भविष्यात ती अधिक उग्र रूप धारण करू नये यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षीपासून कल्याण डोंबिवलीमध्ये शाश्वत आणि सुरक्षित शहर ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये *कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, वृक्षलागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या 7* अत्यावश्यक मुद्द्यांवर तज्ज्ञांकडून नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्यानंतर बालाजी गार्डन गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी ही संकल्पना राबविण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या चर्चासत्राला बालाजी गार्डन गृहसंकुलातील रहिवाशांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने त्यामध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी कचरा व्यवस्थापन विषयावर विक्रम वैद्य, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर अरुण सपकाळे, विद्युत सुरक्षावर भूषण मानकामे, भागवत पाटील यांच्यासह संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता(विद्युत) प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने घरगुती वीज ग्राहकांसाठी बनवण्यात आलेल्या विद्युत तपासणी चेकलिस्ट या महत्त्वपूर्ण माहितीपत्रकाचेही उपस्थित रहिवाशांना वितरण करण्यात आले.

यावेळी खा.डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे संतोष चव्हाण,अमोल भोगले, प्रवीण चौधरी, विवेक खामकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |