निळजे / वार्ताहर: नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात निळजे येथील रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी सार्थक सोमनाथ पाटील याने घवघवीत यश संपादन केले आहे. सार्थकने तब्बल ९३.४०% गुण मिळवून संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सर्वोदय विद्यालय, निळजे या शाळेतून कुमारी मनस्वी गजानन जुमारे ही विद्यार्थीनी 85.80% गुण मिळवून प्रथम आलेली आहे. सर्वोदय विद्यालय व रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कुल या दोन्ही शाळांचा निकाल 100% लागला असून सतत मागील 5 वर्षे शाळेचा निकाल 100% लागत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या इयत्ता 10वी च्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयांसाठी संचालक श्री. महेंद्र पाटील सर तसेच इंग्रजी व समाजशास्त्र या विषयांसाठी मुख्याध्यापिका सौ. चांदणी तिजारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान या विषयांसाठी मुख्याध्यापक श्री. वीरेंद्र पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
मूळचा शिरढोण येथील रहिवासी असलेल्या सार्थकने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे घवघवीत यश मिळवले आहे. तसेच खोणी गावच्या कुमारी मनस्वी गजानन जुमारे हिने कोणताही क्लास न लावता हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे केवळ शाळेचेच नव्हे, तर संपूर्ण शिरढोण-खोणी व परिसरातील गावांचे नाव उज्वल झाले आहे. अभ्यासात सातत्य आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच हे यश गाठता आले, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सार्थकने व मनस्वीने आपल्या या यशाचे श्रेय आपले आई-वडील, कुटुंबीय आणि शाळेतील सर्व मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे. त्याच्या या उत्कृष्ट यशाबद्दल शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शिरढोण- खोणी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी समाजातील विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
विशेष म्हणजे सार्थकने शाळेत शिकता शिकता शाळेतील मोफत कराटे प्रशिक्षणाचा फायदा घेऊन ब्लॅक बेल्ट 2nd DAN संपादन केलेले आहे. त्याचबरोबर त्यांना प्लम्बिंग, सुतारकाम, तबलावादन, हार्मोनियम वादन, गायन, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिफिकेशन, लाठीकाठी, शेती, हायड्रोफोनिक, संगणक जोडणी, मातीकाम, कॉम्प्युटर असेम्बलिंग, सर्व्हेयिंग, कॅन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, चित्रकला, फूड टेक्नॉलॉजी इत्यादी कलांचे प्रशिक्षणही शाळेतून मिळालेले आहे. त्याचबरोबर भगवदगीता व उपनिषदांचा अभ्यासही शाळेतून शिकवलेला आहे. तसेच त्यांच्या स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी सामान्यज्ञान विषयाची तयारीसुद्धा शाळेतून करून घेतलेली आहे.

