ठाणे (16) : ठाणे जिल्हा कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा ११ व १२ जुलै २०२६ रोजी मौलाना अब्दुल कलाम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कौसा-मुंब्रा येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या ॲथलेटिक प्रशिक्षण योजनेच्या (TMCAPY) खेळाडूंनी विविध वयोगटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत एकूण पदकांची लयलूट केली आणि 'ओव्हरऑल चॅम्पियनशिप' (सर्वसाधारण विजेतेपद) पटकावले.
१४ वर्षांखालील मुली गटात काव्या कांगले हिने १०० मीटर धावणे आणि ट्रायथलॉन 'अ' प्रकारात सुवर्णपदके जिंकली. इरा जाधव हिने ट्रायथलॉन 'क'मध्ये सुवर्णपदक मिळवले. सई पालांडे हिने १०० मीटर आणि ट्रायथलॉन 'ब'मध्ये रौप्यपदके पटकावली, तर दुर्वा रास्ते हिने ट्रायथलॉन 'ब'मध्ये कांस्यपदक जिंकले.
१६ वर्षांखालील मुली गटात रिसा फर्नांडिस हिने ६० मीटर धावणे आणि लांब उडी या दोन्ही प्रकारांत रौप्यपदके मिळवली.
१८ वर्षांखालील मुली गटात कानन देसाई हिने ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक, तर २०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले.
२० वर्षांखालील मुली गटात श्रेष्ठा शेट्टी हिने १०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळवले. श्रुती फांसे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक आणि ८०० मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले.
१४ वर्षांखालील मुलांमध्ये आरव विनेरकर याने १०० मीटर आणि ट्रायथलॉन 'क'मध्ये रौप्यपदके जिंकली, तर स्वराज पाटील याने १०० मीटरमध्ये कांस्यपदक मिळवले.
१६ वर्षांखालील मुलांमध्ये अनिरुद्ध नंबूदरी याने ६०० मीटरमध्ये सुवर्णपदक आणि ६० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. धैर्य सूर्यराव याने ६० मीटरमध्ये सुवर्णपदक आणि लांब उडीत कांस्यपदक मिळवले. तसेच स्नेह कामेरकर, धैर्य सूर्यराव, ध्रुव शिरोडकर आणि अनिरुद्ध नंबूदरी यांच्या संघाने मेडली रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले.
१८ वर्षांखालील मुलांमध्ये मानस शिंदे याने २०० मीटर आणि ४०० मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली. नागेश सावंत याने उंच उडीत सुवर्णपदक मिळवले. तनिष लोटणकर याने ४०० मीटरमध्ये रौप्यपदक, तर अभिज्ञान डे याने उंच उडीत कांस्यपदक पटकावले. विघ्नेश मुदलियार, तनिष लोटणकर, नागेश सावंत आणि मानस शिंदे यांच्या संघाने मेडली रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले.
२० वर्षांखालील मुलांमध्ये गिरीक बांगेरा याने ८०० मीटरमध्ये सुवर्णपदक आणि ४०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले.
स्पर्धेतील या उत्कृष्ट कामगिरीमुळे TMCAPY ने सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले.
"खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्युनियर हंगामाची ही एक चांगली सुरुवात आहे. आता आम्ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयारी सुरू करणार असल्याचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी नमूद केले.
क्रीडाअधिकारी मीनल पालांडे, अशोक आहेर (TMCAPY – योजना प्रमुख) यांनी सर्व खेळाडू व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

