प्रजा फाऊंडेशनच्या माध्यमातून नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
ठाणे, (15) : लोकशाही व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने प्रजा फाउंडेशनच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत नगरसेवकांना महानगरपालिकेचे कामकाज, कायदेशीर तरतुदी, विकासकामांचे व्यवस्थापन, नगरसेवकांनी शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासनाशी समन्वय साधून काम करणे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजा फाऊंडेशनाच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त व महापालिका सचिव मनिष जोशी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरूवातीला आयुक्त सौरभ राव यांनी या कार्यशाळेचा उद्देश नमूद केला. प्रशासन आणि सभागृह यांच्या कोणत्याही प्रकारचा संघर्ष नसून दोन्ही घटक शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करतात ही भावना दृढ करण्यासाठी या प्रशिक्षणांचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायदे, नियम आणि प्रक्रियांची माहिती घेताना प्रशासनाचा दृष्टीकोन आणि लोकप्रतिनिधींचा दृष्टीकोन समजून घेणे आवश्यक आहे. एकमेकांच्या मर्यादा, जबाबदाऱ्या आणि अधिकारांचा आदर राखत समन्वयाने काम केल्यास शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल असेही आयुक्तांनी नमूद केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रजा फाऊंडेशन व्यवस्थापक प्रतीक्षा देवळेकर यांनी संस्थांमधील लोकप्रतिनिधींची भूमिका आणि जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले. नगरसेवकांनी शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासनाशी समन्वय साधून काम करणे, नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे आणि त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या माजी सचिव शुभांगी सावंत प्रशिक्षणादरम्यान महानगरपालिकेचे स्थायी समिती आणि महासभेचे अधिकार, विविध विषय समित्यांचे कार्य, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर सविस्तर माहिती दिली. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, नगरसेवकांच्या अधिकार व कर्तव्यांची माहितीही दिली.
यावेळी पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनासाठी माहितीचा अधिकार, नागरिकांचा सहभाग, सामाजिक लेखापरीक्षण यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवून त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि विकासकामांमध्ये जनसहभाग वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
कार्यशाळेत सहभागी नगरसेवकांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांशी संवाद साधला. विकासकामांची अंमलबजावणी, निधी उपलब्धता, प्रशासकीय प्रक्रिया, प्रभाग स्तरावरील समस्या आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा यासंदर्भात चर्चा झाली. तज्ज्ञांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देत विविध उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत करण्यात आलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग निश्चितच ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होईल असा विश्वास सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला.

