डोंबिवली / पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेल येथे सुरू असलेल्या आंदोलनाला केडीएमसीचे नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी हा लढा समाजाच्या स्वाभिमानाचा असल्याचे सांगितले.
आगरी-कोळी समाजाच्या भूमिकन्या रश्मिता पोपेटा यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकृत नामकरण "लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ" असे व्हावे, या मागणीसाठी सलग सहा दिवस अन्न-पाण्याचा त्याग करून उपोषण केले. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली.
आंदोलनस्थळी भेटीदरम्यान दीपेश म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. "मी आगरी समाजाचा भूमिपुत्र आणि लोकनेते दि. बा. पाटील यांचा कार्यकर्ता म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहे. हा लढा कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक हितासाठी नसून संपूर्ण आगरी-कोळी समाजाच्या स्वाभिमानासाठी आहे," असे त्यांनी सांगितले.
यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन रश्मिता पोपेटा यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांची प्रकृती पाहून मन हेलावून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी आगरी-कोळी समाजबांधवांना आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत, "रश्मिता ताईंचे कुटुंब आजही आंदोलनस्थळी ठामपणे उभे आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या वतीने आंदोलनस्थळी उपस्थित राहून हा न्याय्य लढा सुरू ठेवावा. हा आपल्या समाजाच्या अस्मितेचा लढा आहे," असे आवाहन केले.
तसेच आंदोलनकर्त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत खांद्याला खांदा लावून साथ देण्याचा विश्वासही दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.
यावेळी मोठागाव व जुनी डोंबिवली येथील ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

