अधिवेशन संपताच बैठकीचा धडाका ; आमदार तरे ऑन फिल्ड
पालघर / ढेकाळे / विरार. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताच बोईसर विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्यासह महसूल, महानगरपालिका, महावितरण, आरोग्य, कृषी तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये तसेच वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक प्रभागामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र नागरिकांना शासनाच्या नियमानुसार मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, यासाठी महसूल विभाग व महानगरपालिकेमार्फत संयुक्त पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्य, पिण्याचे पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत तातडीने करण्यात यावा, तसेच कोणतेही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. शहरातील नाले, गटारे व जलनिस्सारण व्यवस्थेचा स्वतंत्र अभ्यास करून पूर्वी अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्यांची व गटारांची मूळ रुंदी कायम राखण्यात यावी, अतिक्रमणांमुळे जलप्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा सविस्तर अहवाल तयार करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, तसेच भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. मौजे राजावली व टिवरी परिसरातील महसूल विभागाच्या जमिनींवरील अतिक्रमणांची तात्काळ पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर शहरातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, पाणी साचण्याची कारणे, जलनिस्सारण क्षमतेतील त्रुटी तसेच आवश्यक अभियांत्रिकी उपाययोजनांचा सविस्तर तांत्रिक अहवाल तयार करून त्यावर महानगरपालिका व मंत्रालय स्तरावर स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टीनंतर नाले व गटारांमध्ये साचलेला गाळ, कचरा व इतर अडथळे तातडीने हटवून जलनिस्सारण व्यवस्था पूर्ववत करण्याबरोबरच सर्व संवेदनशील ठिकाणांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरण विभागाच्या वसई, विरार, पालघर व बोईसर विभागातील अधिकाऱ्यांनी वीजपुरवठ्याबाबत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींचा आढावा सादर केला. त्यानुसार आवश्यक समन्वय साधून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आमदार विलास तरे यांच्याकडून देण्यात आल्या.
पूरस्थितीनंतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, विहिरी व इतर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने तपासणे, दूषित पाणी आढळणाऱ्या भागात आवश्यक औषधांचे वितरण करणे, तसेच दोन फिरते दवाखाने प्रत्येक गावात पाठवून नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचाराची व्यवस्था करावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. कृषी विभागाचे अधिकारी यांना शेतजमिनीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांची यादी माझ्याकडे व प्रशासनाकडे द्यावी, जेणेकरून नुकसान भरपाई लवकर मिळण्यास मदत होईल. बैठकीच्या शेवटी आमदार विलास तरे यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ दिलासा देणे, नुकसानग्रस्तांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ वेळेत उपलब्ध करून देणे तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
यावेळी आमदार विलास तरे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, पालघर उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार वसई दिपक गायकवाड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चौधरी, मनपा प्रभाग एफ सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी, मनपा प्रभाग जी सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे, वसई तालुका कृषी अधिकारी सुरेज जाधव, महावितरण वसई पूर्व अति. कार्यकारी अभियंता महेश विजय माधवी, उप कार्यकारी अभियंता पालघर एस.जे. मुंगारे, बोईसर उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगेन, वसई कार्यकारी अभियंता ईश्वर एम. भारती, कार्यकारी अभियंता पालघर महावितरण नितीन संखे, कनिष्ठ कार्यकारी अभियंता पालघर गुणवत झालकोटे, सार्व. बांध. विभाग वसई शैलेंद्र गायकवाड, सार्व. बांध. विभाग पालघर अरुण बाळू चौधरी, सार्व. बांध. विभाग पालघर विनोद जाधव, सार्व. बांध. विभाग पालघर ए. के. संखे, विभागीय अभियंता सार्व. बांध. विभाग पालघर संदिप राऊत, सहाय्यक अभियंता सार्व. बांध. विभाग पालघर दत्ताप्रसाद गोळफडे, मंडळ कृषी अधिकारी सफाळे पुरुषोत्तम धाक्रे, मंडळ कृषी अधिकारी दहिसर तर्फे मनोर हरेश जनाठे, यांच्या सह भाताणेचे शिवसैनिक शैलेश खोत, अभिषेक सिंह ठाकुर, सावरे एन्बुर ग्रामपंचायत सरपंच सुदर्शन वनगा, उपसरपंच रमेश ठाकरे, शिवसैनिक भरत बरडे यांच्या सह अनिके अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

.png)